मुंबई -संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतर सुद्धा महामंडळाच्या पाच हजार निवृत्त कर्मचाऱ्यांना स्वतःच्या हक्काच्या पैशासाठी आगारात चकरा माराव्या लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाच हजार कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन वर्षापासून 150 कोटी रुपये एसटी महामंडळाकडे थकीत आहेत. त्यामुळे महामंडळाने निवृत्त कामगारांचे दीडशे कोटी हडप तर केले नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माहिती देताना श्रीरंग बरगे काय आहे प्रकरण-
एसटी महामंडळात निवृत्त झालेले कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जाते. मात्र, 2019 पासून तब्बल राज्यभरातील 5 हजार निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पैसे अद्यापही महामंडळाकडून मिळालेले नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे दीडशे कोटी रुपये देणे थकीत आहे. अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या मुख्यालयात गेल्या दोन वर्षापासून चकरा मारत आहे. मात्र, आतापर्यंत त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेले नाही. त्यामुळे एसटी कामगार संघटनेकडून सुद्धा एसटी महामंडळाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, 31 मार्चला होणार एन्डोस्कॉपी
अधिकाऱ्यांना रक्कम कशी मिळाली?
आशिया खंडातील सर्वाधिक मोठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थामध्ये एसटी महामंडळ गणली जाते. तरीही 2019 पासून 5 हजार कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरक मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मुंबई येथील मुख्यालयात काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सदरची रक्कम मिळालेली आहे. मात्र आगारात काम करून निवृत्त झालेल्या चालक- वाहक यांत्रिक कर्मचारी यांना पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे सरसकट सर्व कामगारांना निवृत्तीचे थकीत पैसे व्याजासह देण्याची मागणी महाराष्ट्र, एस. टी कर्मचारी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र दिनी आंदोलन-
एसटी महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत देणी तात्काळ व्याजासह मिळावी यासाठी आम्ही एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. जर पाठपुरावा करून सुद्धा निवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत देणी मिळाली नाही. तर आम्ही 1 मे 2021 महाराष्ट्र दिनानिमित्त एसटी महामंडळ याविरोधात आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.
हेही वाचा -संजय राऊतांचे घुमजाव; पवार-शाह गुप्त भेट झालीच नसल्याची दिली प्रतिक्रिया