महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विशेष.! 'तो' दिवस आठवल्यावर आजही लाखो मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहतो - मुंबई महापूर 2005

मुंबईत २६ जुलै २००५ रोजी १८ तासात ९९४ मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. मुंबईत एकूण पडणाऱ्या पावसाच्या जवळपास निम्मा पाऊस काही तासात पडल्याने मायानगरी मुंबईत महापूर आला होता. मिठी नदीने रौद्र रूप धारण केल्याने मुंबई अगदी जलमय झाली होती...

mumbai flood in july 26 2005
मुंबई महापूर 2005

By

Published : Jul 26, 2020, 4:43 AM IST

मुंबई - भारताची आर्थिक राजधानी आणि जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबईत काही तास पाऊस पडल्यावर मुंबईची तुंबई होते. आजही मुंबईत तीन ते चार तास सतत पाऊस पडल्यास मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहतो. २६ जुलै २००५ साली मुंबईत पडलेल्या पावसाची आणि मुंबई जलमय झाल्याच्या आठवणी आजही मुंबईकर जाग्या करतात. आज या घटनेला १५ वर्ष पूर्ण होत आहेत.

मुंबईत २६ जुलै २००५ रोजी १८ तासात ९९४ मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. मुंबईत एकूण पडणाऱ्या पावसाच्या जवळपास निम्मा पाऊस काही तासात पडल्याने मायानगरी मुंबईत महापूर आला होता. मिठी नदीने रौद्र रूप धारण केल्याने मुंबई अगदी जलमय झाली होती. मुंबईकरांची घरे, दुकाने, वाहने पाण्याखाली गेली होती. मिठी नदी किनाऱ्याच्या इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचले होते. मुंबईमधील रस्ते, ट्रेनची वाहतूक ठप्प झाली होती. मुंबईत सर्वत्र पाणीच पाणी असल्याने मुंबईकरांनी आहे त्याच ठिकाणी राहणे पसंद केले. जलप्रलयादरम्यान पाण्यात बुडून तब्बल १ हजार ४९३ जणांचा मृत्यू झाला होता. पावसामुळे मुंबई ठप्प झाल्याने ४५० कोटीं रुपयांचे नुकसान झाले होते. १४ हजार घरांमध्ये पाणी शिरल्याने घरामधील सामानाचे नुकसान झाले होते. पाण्यामुळे ५२ लोकल ट्रेन, ४ हजार टॅक्सी, ३७०० रिक्षा, ९०० बेस्टच्या बसेसचेही नुकसान झाले होते.

२६ जुलै हा दिवस आठवला की आजही मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहतो...

२६ जुलै २००५ ला मुंबई जलमय झाल्यावर राज्य सरकार आणि पालिकेने मिठी नदीचे रुंदीकरण, सौंदर्यीकरण, नदी पात्रातील बांधकामे हटवणे, मुंबईमधील पडणाऱ्या पावसाचे पाणी समुद्रात आणि खाडीत सोडण्यासाठी नाल्यांची रुंदी आणि खोली वाढवणे, पावसाचे पाणी अधिक गतीने समुद्रात सोडता यावे म्हणून पम्पिंग स्टेशन उभारणे आदी प्रकल्प हाती घेतले होते. यापैकी काही प्रकल्प आजही पूर्ण झालेले नाहीत. यामुळे मुंबईत २६ जुलै २००५ च्या घटनेनंतर आजही सखल भागात पावसाचे पाणी साचत आहे. मुंबईत काही तास सतत पाऊस पडल्यास साचलेले पाणी पाहून मुंबईकर २६ जुलैच्या आठवणी जाग्या करत असतात.

हेही वाचा -औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी आता धडक कारवाई, राजेंद्र शिंगणेंचे मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांना पत्र

मिठी नदीचे काम आजही अर्धवट -

मुंबईतील जलप्रलयाचा अभ्यास करताना, मिठी नदीवरील अनधिकृत बांधकामांमुळे नदीचे पात्र छोटे झाल्याने पाणी समुद्रात जाण्यास अडथळा निर्माण झाल्याचे समोर आले. मिठी नदीचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले. एमएमआरडीए आणि पालिकेला हे काम देण्यात आले. पुढे एमएमआरडीएने या कामातून आपले अंग काढून हे काम पालिकेच्या माथी मारले. आजही मिठी नदीच्या रुंदीकरणाचे आणि सुशोभीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही.

ब्रिमस्टोवॅड प्रकल्प अर्धवट -

मुंबईतील पावसाळी पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी व पुरावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने १९९३ मध्ये ब्रिमस्टोवॅड प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नव्ह्ती. २६ जुलै २००५ ला मुंबई जलमय झाल्याने २००७ पासून याची अंमलबजावणी कारण्यात आली. नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करणे त्यावरील अतिक्रमणे हटवणे आदी कामे यामधून केली जाणार होती. त्यासाठी पालिकेने १२०० कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन केले होते. आतापर्यंत पालिकेने तीन पट खर्च केला आहे. तरीही अद्याप हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. पालिकेने 53 ते 60 नाले रुंद केले आहेत. 23 नाल्यांच्या रुंदीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. तर 12 नाल्यांचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

मुंबईतील 2005 मधील महापूराची दृश्ये...

६ पम्पिंग स्टेशनचे काम पूर्ण -

मुंबईमध्ये पाऊस पडल्यावर अनेक सखल भागात पाणी साचते. हे साचलेले पाणी गटार आणि नाल्याच्या मार्गाने अधिक गतीने समुद्रात सोडण्यासाठी पालिकेने सहा पम्पिंग स्टेशन बांधली आहेत. त्यात हाजी अली पम्पिंग स्टेशनसाठी १०० कोटी, इर्ला पम्पिंग स्टेशनसाठी ९० कोटी, लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशनसाठी १०२ कोटी, क्लिव्हलँड बंदर पम्पिंग स्टेशनसाठी ११६ कोटी, ब्रिटानिया पम्पिंग स्टेशनसाठी १२० कोटी, गझदर पंपिंग स्टेशनसाठी १२५ कोटी रुपये खर्च केले आहेत.

आपत्कालीन व्यवस्थापन विभाग -

२६ जुलैच्या घटनेनंतर बचाव कार्य व सर्व सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय राखता यावा म्हणून मुंबई महापालिकेत आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची स्थापना करण्यात आली. मुंबईत आग लागणे, घरे, इमारती कोसळणे, समुद्रात नाल्यात वाहून जाणे आदी घटना आपत्कालीन घटना घडल्यावर हा विभाग सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचे काम करत असतो. मुंबईत पाणी साचण्याच्या ठिकाणी विशेष करून मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यावर या विभागाकडून समन्वय साधून हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी दरवर्षी हलवले जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details