मुंबई - मुंबईमध्ये डिसेंबरपासून रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबईत पुन्हा कोरोनाचा प्रसार सुरू झाला आहे. या प्रसाराला रोखण्याचे काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. गेल्या ५ दिवसात मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील १४० जण पाॅझिटिव्ह आढळले ( KEM Hospitals Doctors Covid Positive ) आहेत. त्यांच्यापैकी बहुतेक बरे झाले आहेत.
५ दिवसात १४० पॉजिटिव्ह -
मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. मुंबईत दिवसाला कोरोनाचे २० हजार रुग्ण आढळून आले आहेत. सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून खासगी तसेच पालिका, सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. अशा रुग्णांवर उपचार करताना मुंबई महापालिकेचे प्रमुख रुग्णालयापैकी एक असलेल्या केईएम रुग्णालयात १ ते ५ जानेवारी या ५ दिवसात १४० जण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. यात निवासी डॉक्टर ८१, शिकाऊ डॉक्टर ३५ व विविध विभागांतील २४ असे १४० जण कोरोनाबाधित आढळल्याचे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.
सेव्हन हिलमध्ये उपचार -
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांवर उपचार करताना आमचे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी पॉजिटीव्ह येत आहेत. ज्यांना लक्षणे नाहीत त्यांना त्यांच्या हॉस्टेलमध्ये तर ज्यांना लक्षणे आहेत त्यांच्यावर सेव्हन हिल रुग्णालयात उपचार केले जात आहेत. चार ते पाच दिवसात बहुतेक डॉक्टर बरे झाले आहेत. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले -
राज्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत प्रचंड वाढ होताना दिसत ( Covid Outbreak In Maharashtra ) आहे. गुरुवारी मागील 24 तासांत 36 हजार 365 बाधितांची नोंद ( New Covid Cases In Maharashtra ) झाली. त्यापैकी मुंबईत सुमारे 20 हजार रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूदर कमी झाला आहे. आज एकूण 13 रुग्ण दगावले आहेत. तर दुसरीकडे ओमायक्रॉन या नव्या व्हेरीयंटचे 79 रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचे आठ हजार 907 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. ही दिलासादायक बाब आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ( Maharashtra Health Department ) यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे.
हेही वाचा -Covid Outbreak In Maharashtra : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक.. 24 तासांत 36 हजार जण पॉझिटिव्हऽ