मुंबई -बाळासाहेब ठाकरे आरोग्य योजनेंतर्गत पालिकेने पहिल्या टप्प्यात १३ दवाखाने सुरु करण्यासाठी लवकरच निविदा काढल्या जाणार ( 13 dispensaries with various facilities in Mumbai ) आहेत. हे दवाखाने जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु केले जाणार आहेत. मलेरिया, डेंग्यू अशा आजारांसह आता स्किन, डोळे, नाक, कान, घसा आदींवर उपचार व चाचण्यांची सुविधा या दवाखान्यात उपलब्ध होणार आहे. या दवाखान्यांमुळे नागरिकांना त्यांच्या घराजवळ उपचार आणि चाचण्या करता येणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी दिली.
रुग्णालयांवरचा ताण कमी होणार -रुग्णांना घराजवळच चाचणी करता यावी यासाठी बाळासाहेब ठाकरे योजने अंतर्गत पालिकेच्या दवाखान्यात चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेची नायर, केईएम व सायन ही तीन प्रमुख रुग्णालये आहेत. मुंबईसह देशभरातील रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असतात. या रुग्णालयांवरील ताण कमी व्हावा तसेच मुंबईकरांना घराजवळच चाचणी व उपचार मिळावे. यासाठी बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र सुरु करण्याचे २०२२ - २३ च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित होते. आता या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून १३ दवाखान्यांमध्ये आवश्यक चाचण्यांसाठी यंत्रसामग्री व तज्ज्ञ डॉक्टर- आरोग्य कर्मचार्यांची व्यवस्था करण्याबाबतची कामे सुरु आहेत. नव्या आरोग्य केंद्रांवर रक्त किंवा त्या-त्या आजाराच्या चाचणीसाठी आवश्यक नमुने घेतले जाणार आहेत. या दवाखान्यांमुळे पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांवरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.