मुंबई- कोरोनाचे संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याने देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बेस्टमधील 5 कर्मचारी सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे बेस्टमधील कोरोना बाधितांचा आकडा 13 वर पोहोचला आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे.
देवनार डेपोमधील चालक, कुलाबा, सांताक्रूझ आणि विक्रोळी डेपोमधील वाहक तसेच दादर डेपोमधील मेंटेनन्स विभागाच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. देवनार डेपोमधील 51 वर्षीय चालकाला जास्त कॉलेस्ट्रोल, हायपरटेन्शनचे आजार असून तो नवी मुंबईतील कामोठे येथे राहणारा आहे. त्याच्या घरातील 4 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या चालकासोबत काम करणारा व कोपरखैनारे येथे राहणारा वाहकही पॉझिटिव्ह आला आहे. बेस्टमध्ये नव्याने आढळून आलेल्या कोरोना बाधित 3 कर्मचाऱ्यांच्या पत्नीनाही कोरोनाची लागण झाल्याने बेस्टच्या परेल डेपोमधील ते राहत असलेली इमारत सिल करण्यात आली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे प्रकार वाढल्याने ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे, ज्यांचे वय जास्त आहे, अशा कर्मचाऱ्यांना कामातून सूट देण्यात आली आहे.