महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बर्ड फ्लूचे संकट: मुंबईत २४ तासांत २१४ पक्ष्यांचा मृत्यू - Bombay bird flu update news

बर्ड फ्लूने महाराष्ट्रात शिरकाव केल्यानंतर राज्य आणि मुंबई महापालिका सतर्क झाले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. याचाच एक भाग मृत पक्ष्यांच्या अवशेषांचे शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावली जात आहे.

http://10.10.50.85//maharashtra/17-January-2021/mh-mum-1296birds-death-7205149_17012021234357_1701f_1610907237_971.jpg
http://10.10.50.85//maharashtra/17-January-2021/mh-mum-1296birds-death-7205149_17012021234357_1701f_1610907237_971.jpg

By

Published : Jan 18, 2021, 12:15 AM IST

Updated : Jan 18, 2021, 5:03 AM IST

मुंबई- राज्यात बर्ड फ्लूमुळे भीतीचे वातावरण आहे. मुंबईत गेल्या २४ तासात २१४ तर गेल्या सात दिवसात १२९६ कावळे, कबुतरांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या हेल्पलाईन क्रमांकावर नोंदी झाल्या आहेत. मुंबईत बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पक्षांच्या मृत्यूच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत असल्याने महापालिका यंत्रणा सतर्क झाली आहे.

राज्यात बर्ड फ्लूच्या तक्रारी आल्यानंतर मुंबई महापालिकेने ५ डिसेंबरपासून १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. १० जानेवारीच्या सकाळी ७ वाजल्यापासून १७ जानेवारीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत सात दिवसात १२९६ कावळे, कबुतर आणि चिमण्या या पक्षांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत.

हेही वाचा-कोरोना लसीकरण मोहिमेसाठी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी केले मोदींचे अभिनंदन

२४ तासात २१४ पक्षांचा मृत्यू-
शनिवार १६ जानेवारीच्या सकाळी ७ ते रविवार १७ जानेवारीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत २४ तासात २१४ कावळे, कबुतर आणि चिमण्या या पक्षांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. मुंबईतील कुलाबा, बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरी, दादर, प्रभादेवी, वडाळा,माटुंगा, सायन, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी, चंदनवाडी आदी परिसरातून या तक्रारी नोंद झाल्या आहेत. मृत पक्षांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे कावळा आणि कबुतरांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत.

हेही वाचा-'शिवसेना ईडी - भाजपच्या प्रेशरमध्ये तर येत नाही ना'

महापालिका सतर्क -
बर्ड फ्लूने महाराष्ट्रात शिरकाव केल्यानंतर राज्य आणि मुंबई महापालिका सतर्क झाले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. याचाच एक भाग मृत पक्ष्यांच्या अवशेषांचे शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावली जात आहे. मुंबईत पोल्ट्रीशी संबंधीत मोठे व्यवसाय नाहीत. त्यामुळे इतर शहरांप्रमाणे मुंबईला बर्ड फ्ल्यूचा धोका नाही. एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृत पक्षी आढळले तर अशा पक्ष्यांचे नमुने विशिष्ट टीमकडून गोळा केले जातात. कारण त्यात बर्ड फ्ल्यूचा संशय असतो. त्यांची वेगळया ठिकाणी विशिष्ट पध्दतीने विल्हेवाट लावली जाते. मात्र, संख्या कमी असली तरीही खबरदारी घेतली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अशी लावली जाते विल्हेवाट -
मृत पक्ष्यांची तक्रार पालिकेच्या आपात्कालीन नियंत्रण कक्षाकडे आल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी पीपीई कीट घालून त्या जागेवर पोहोचतात. मृत पक्ष्याचे अवशेष पिशवीत गोळा केला जातो. पिशवीत विशिष्ट रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण कमी होते. ही पिशवी त्याच वाॅर्डमधील निर्जन ठिकाणी ५ फुटाचा खड्डा तयार करून पुरली जाते. त्यानंतर पुन्हा तो खड्डा माती आणि रसायनांनी बुजवला जातो. हा खड्डा कुत्रे किंवा इतर प्राणी उरकून काढू नये, यासाठी त्यावर दगड किंवा इतर वस्तू ठेवली जाते.

येथे साधा संपर्क -
मुंबईत मृत पक्षी आढळून येत आहेत. मृत पक्षी आढळून आल्यास महापालिकेच्या आपत्कालीन विभागातील हेल्पलाईन क्रमांक 1916 या नंबरवर तात्काळ संपर्क साधावा. तसेच शासनाने नियुक्त केलेल्या रॅपिड रेस्पॉन्स टीममधील डॉ. हर्षल भोईर : 9987280921 आणि डॉ. अजय कांबळे : 9987404343 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

धोका नाही, पण काळजी घ्या -
बर्डफ्ल्यूमुळे माणसांना काहीही धोका नाही, तरीही काळजी घेणे आवश्यक आहे. एखादा पक्षी किंवा प्राणी मरून पडला असल्यास त्याला हात लावू नये. त्याची माहिती पालिकेच्या विभाग कार्यालय किंवा आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला द्यावी. कच्चा मासाहार करू नये. मटण, चिकन, अंडी चांगले शिजवून खाणे आवश्यक आहे. असे आवाहन मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले.

अशी घ्या काळजी -
१) कोणताही कच्चा मांसाहार टाळा.
२) कच्ची अंडी, कच्चे चिकन खाऊ नये, योग्य प्रकारे शिजवून घेणे आवश्यक आहे.
३) पोल्ट्री उद्योजकांनी, विक्री करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांनी स्वच्छता पाळावी.
४) पशु, पक्षी यांच्याशी संपर्क टाळावा, त्यांची विष्ठा, लाळ यांच्याशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी.
५) घरातील पाळीव पशु, पक्षांची भांडी, पिंजरे स्वच्छ ठेवा.
६) उरलेल्या मांसाची योग्य ती विल्हेवाट लावावी.
७) एखादा पशु, पक्षी मरण पावलेला आढळला तर त्याला हात लावायचा नाही. त्याची सूचना पालिकेच्या आपत्कालीन विभागाला कळवावे.

Last Updated : Jan 18, 2021, 5:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details