मुंबई - मुंबईतील सफाई कामगारांच्या जीर्ण झालेल्या घरांचा प्रश्न मार्गी आता लागणार आहे. राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात बारा हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला ( Cleaning Staff Home In Mumbai ) आहे. ही घरे टप्पा टप्प्याने हस्तांतरित केले जातील, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) यांनी विधान परिषदेत केली आहे. विधान परिषदेचे सदस्य भाई गिरकर यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या घराबाबत तारांकित प्रश्न विचारला होता.
मुंबईत आजच्या घडीला 5592 सफाई कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. तर 29 हजार घरे बांधली जाणार आहेत. त्यापैकी 12 हजार सफाई कामगारांना घरे देण्याची योजना आहे. घरे बांधण्यासाठी काढलेल्या निविदेला 9 वेळा मुदतवाढ दिली. सन २००८ पासून सुरू झालेली ही योजना आता प्रत्यक्षात येत आहे. कंत्राटदाराकडून या सदनिकांबाबतचे आराखडे तयार केले जात आहेत. लवकरच सदनिकांचे बांधकाम सुरू होईल.
अतिशय दाटीवाटीच्या ठिकाणी या 39 सफाई कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या वसाहती आहेत. त्याठिकाणी पहिल्या टप्प्यात 5.4 एफएसआयच्या माध्यमातून 12 हजार लोकांना घरे देण्यासाठी महापालिकेचा प्रयत्न असेल. सफाई कामगारांसाठी किमान 300 चौरसफुटांची घरे बांधली जातील. पंचवीस वर्षांहून अधिक सेवा झालेल्या सफाई कामगारांना टप्प्याटप्प्याने ती दिली जातील. कोणीही बेघर होणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.