मुंबई -आशियातील खंडातील पहिली ट्रेन ( First Train In Asia ) मुंबई ते ठाणे दरम्यान शनिवारी, १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. भारतीय रेल्वे ( Indian Railways ) १६ एप्रिल २०२२ पासून देशाच्या सेवेच्या १७०व्या वर्षात प्रवेश करत आहे. भारतातील रेल्वेच्या 'पहिल्या प्रवासाच्या प्रित्यर्थ, 'आझादी' का अमृत महोत्सव', रेल्वे सप्ताह आणि जागतिक वारसा दिवसानिमित्ताने सोमवारी मध्य रेल्वे, युनेस्को हेरिटेज साइट असलेल्या सीएसएमटीच्या हेरिटेज इमारतीवर ( Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Heritage Building ) एक अनोखा ध्वनी-प्रकाश परफॉर्मन्स शो ( Light Sound Performance Show ) सादर करणार आहे.
असा आहे इतिहास-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही भारतीय रेल्वे आणि संपूर्ण रेल्वे समूहाची शान आहे. सन १९०० मध्ये, इंडियन मिडलँड रेल्वे कंपनी मध्य रेल्वेच्या पूर्ववर्ती ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेमध्ये विलीन झाली. तिच्या सीमा उत्तरेला दिल्ली, ईशान्येला कानपूर आणि अलाहाबाद आणि पूर्वेला नागपूर ते दक्षिण-पूर्वेला रायचूरपर्यंत वाढवण्यात आल्या. अशाप्रकारे, मुंबईद्वारे भारताच्या जवळजवळ सर्व भागांशी संपर्क साधला गेला. G.I.P चे रेल्वेमार्ग १६०० मैल (२५७५ किमी) होते. नोव्हेंबर १९५१ मध्ये निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि ढोलपूर राज्य रेल्वे यांचे एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मध्य रेल्वेवर मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे असे ५ विभाग आहेत. मध्य रेल्वेचे नेटवर्क महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये ४,१८३ मार्ग किमीवर पसरलेले आहे.
आपला इतिहास दाखवणार-या आठवडा अखेरीस एक अनोखा लाइट आणि साउंड कम परफॉर्मन्स शो आयोजित करण्यात आला आहे. हा शो नाट्यशास्त्राच्या नऊ रसांच्या विविध भावभावनांमधून आपला इतिहास दाखवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीवर रेल्वे आणि देशाच्या इतिहासातील विविध ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित विविध भावनांना उजाळा देणारा हा कार्यक्रम नृत्य, नाटक, संगीत, कविता आणि स्वर सादरीकरणाद्वारे सादर केला जाईल. आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज इमारतीतील थीम लाइटिंग सिस्टिमच्या नवीन झगमगाटाचा आनंद घेता येणार आहे.