मुंबई - ओमायक्रॉनच्या रुगसंख्येत दिवसेंदिवस चढ उतार दिसून येत असून आज राज्यात तब्बल 11 नव्या रुग्णांची भर पडली. दोन अल्पवयीन मुलांचा यात समावेश आहे. एकाने आंतरराष्ट्रीय प्रवास केला असून एक निकटवर्तीय असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. पुण्यातील एका पाच वर्षांच्या मुलामध्ये यापूर्वी ओमायक्रॉनची लक्षणे दिसून आली आहेत.
हेही वाचा -ST Workers Apologize for Strike :एसटी कर्मचाऱ्यांनी नागरिकांची मागितली माफी, म्हणाले...
825 कोरोनाबाधित
राज्यात ओमायक्रॉनचा सोमवारी एकही रुग्ण सापडला नव्हता, शिवाय कोरोनाचे रुग्णही घटले होते. आरोग्य विभागाने यामुळे सुटकेचा निःश्वास टाकला होता. मात्र, दोन्ही विषाणूंच्या संख्येत आज वाढ झाल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोना विषाणूची आज 825 नव्या रुग्णांना लागण झाली. त्यापैकी चौदा जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. राज्यात लसीकरण आणि चाचण्यांवर भर दिला आहे. आजपर्यंत 6 कोटी 78 लाख 83 हजार 061 चाचण्या केल्या. सुमारे 66 लाख 50 हजार 965 रुग्णांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. आजच्या 825 नव्या रुग्णांचा यात समावेश आहे. तर, 972 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64 लाख 98 हजार 807 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर 97.71 टक्के इतका आहे. तर, मृत्यूदर 2.12 टक्के आहे. राज्यात आतापर्यंत 7 हजार 111 अॅक्टिव्ह रुग्ण असून 73 हजार 53 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
ओमायक्रॉनचे 65 रुग्ण
राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचा प्रादुर्भाव कासवाच्या गतीने वाढतो आहे. राष्ट्रीय विज्ञान संस्थेने ओमायक्रॉनबाबत दिलेल्या अहवालानुसार, आज 11 नवे रुग्ण सापडले. त्यापैकी 9 मुंबईतील आणि उर्वरित 3 पिंपरी चिंचवड, नवी मुंबई आणि उस्मानाबाद येथील आहेत. मुंबईतील 8 रुग्णांपैकी 1 केरळ, 1 गुजरात आणि 1 ठाण्यातील आहे. तर, 18 वर्षांखालील एक मुलगा आणि एका मुलीचा यात समावेश आहे. उस्मानाबाद येथील निकटवर्तीयाच्या मुलीला लागण झाली असून, नवी मुंबईतील मुलाने आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. दोन्ही मुलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या राज्यात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या 65 वर पोहचली आहे.