मुंबई -मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु आहे. जनजागृती व्हावी म्हणून १०० टक्के पूर्ण लसीकरण झालेल्या सोसायट्यावर पोस्टर लावले जात आहेत. मुंबईमधील तब्बल १० हजार सोसायट्यांनी १०० टक्के लसीकरण पूर्ण केल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. दरम्यान मुंबईमध्ये डिसेंबर महिन्यात रुग्ण वाढण्याची शक्यताही आयुक्तांनी व्यक्त केली आहे.
सोसायट्यामध्ये १०० टक्के लसीकरण पूर्ण
१० हजार सोसायट्यामध्ये १०० टक्के लसीकरण
मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला रुग्ण आढळून आला. गेल्या दीड वर्षात कोरोना विषाणूच्या दोन लाटा येऊन गेल्या. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. मुंबईमधील ९७ टक्के नागरिकांना लसीचा पहिला तर ५८ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. नागरिकांमध्ये लसीकरणाचे महत्व वाढावे म्हणून ज्या सोसायटीमधील १०० टक्के रहिवाशांनी लस घेतली आहे. अशा सोसायट्यांवर १०० टक्के लसीकरण झाल्याचे पोस्टर पालिकेकडून लावले जात आहेत. मुंबईत एकूण सुमारे ३७ हजार सोसायट्या असून त्यापैकी २२ हजार सोसायट्या नोंदणीकृत आहेत. त्यापैकी १० हजार सोसायटीमधील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.
हेही वाचा -मुंबईत सीमाशुल्क विभागाने 2 किलो सोन्याची पेस्ट विमानातून केली जप्त
डिसेंबरमध्ये रुग्ण वाढणार
मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्याने १५ ऑगस्टपासून निर्बंध शिथिल करण्यात आले होते. याच दरम्यान गणेशोत्सव, नवरात्री आदी सण साजरे केले. यादरम्यान रुग्णसंख्या वाढलेली नाही. ३०० ते ४०० च्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. एकदाच ५०० च्या वर रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे रुग्णसंख्या वाढलेली नाही हे दिसून येत आहे. मात्र येत्या काही दिवसात दिवाळी, तुळशीचे लग्न, ख्रिसमस आदी सण साजरे केले जाणार आहेत. यावेळी खरेदीसाठी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामुळे डिसेंबरदरम्यान रुग्णसंख्या वाढू शकते अशी शक्यता काकाणी यांनी व्यक्त केली आहे. दिवाळीसाठी सरकार गाईडलाईन काढू शकते त्यानंतर पालिकाही गाईडलाईन काढेल असे त्यांनी सांगितले.
९० टक्के बेड रिकामे
मुंबईमधील कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्याने पालिका रुग्णालये आणि जंबो कोविड सेंटरमधील १० टक्के बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. इतर ९० टक्के बेड रिकामे आहेत. सध्या बीकेसी, नेसको, मुलुंड, वरळी, भायखळा या पाच ठिकाणी जंबो कोविड सेंटर सुरु आहेत. तर दहिसर, मालाड, कांजूरमार्ग, सायन आदी ठिकाणचे जंबो कोविड सेंटर सुसज्ज करून ठेवण्यात आले आहेत. हे सर्व जंबो कोविड सेंटर डिसेंबर अखेरपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्यावेळची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल असे काकाणी यांनी संगितले.
हेही वाचा -राज्य सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे वेतन थांबवले