मुंबई -मुंबईत गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार असून डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली. या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग चाचण्या (Genome Sequencing Test) करण्यात येत आहेत. या चाचण्यांच्या सातव्या फेरीत ‘ओमायक्रॉन’चे (Omicron) ५५ टक्के, आठव्या फेरीत ८९ टक्के, नवव्या फेरीत ९५ टक्के तर नुकत्याच करण्यात आलेल्या दहाव्या फेरीत १०० टक्के रुग्ण ‘ओमायक्रॉन’चे आढळून आले आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
१०० टक्के ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण -
मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या तीन लाटा आटोक्यात असून नेमक्या कोणत्या विषाणूचा किंवा व्हेरियंटचा प्रसार आहे याची माहिती घेण्यासाठी ‘कोविड - १९’ विषाणूच्या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग चाचण्या ऑगस्ट २०२१ पासून फेरीनिहाय करण्यात येत आहे. १० व्या फेरीतील चाचण्यांसाठी ३७६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २३७ नमुने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील होते, तर उर्वरित नमुने हे बृहन्मुंबई मनपा क्षेत्राबाहेरील होते. बृहन्मुंबई मनपा क्षेत्रातील २३७ नमुन्यांपैकी १०० टक्के अर्थात सर्व २३७ नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या व्हेरियंटने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे देण्यात आली आहे.
२१ ते ६० वयोगटातील सर्वाधिक रुग्ण -
१० व्या फेरीतील चाचणींच्या निष्कर्षांचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता, २३७ रुग्णांपैकी २९ टक्के अर्थात ६९ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील आहेत. तर ४१ ते ६० या वयोगटात देखील २९ टक्के म्हणजेच ६९ एवढेच रुग्ण आहेत. २५ टक्के म्हणजेच ५९ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटातील आहेत. १२ टक्के म्हणजेच २९ रुग्ण हे '० ते २०' या वयोगटातील; तर ५ टक्के म्हणजे ११ रुग्ण हे ८१ ते १०० या वयोगटातील आहेत. चाचण्या करण्यात आलेल्या २३७ नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटातील २५ नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी, ४ नमुने हे ० ते ५ वर्षे या वयोगटातील, ९ नमुने ६ ते १२ वर्षे या वयोगटातील; तर १२ नमुने १३ ते १८ वर्षे या वयोगटातील होते. हे सर्व नमुने ‘ओमायक्रॉन’ या कोविड विषाणुच्या उप प्रकाराने बाधित असल्याचे आढळून आले. तथापि, या रुग्णांना कोविड बाधा झाल्याची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.
१०३ रुग्णांनी लस घेतली नव्हती -
‘कोविड’ प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या आधारे विश्लेषण केले असता, २३७ पैकी ६ रुग्णांनी लशीची केवळ पहिली मात्रा घेतलेली होती. यापैकी एका रुग्णास रुग्णालयात दाखल करावे लागले. लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या १२८ रुग्णांपैकी ७ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी एका रुग्णास ऑक्सिजनची गरज भासली, तर एका रुग्णास अतिदक्षात विभागात दाखल करावे लागले. एकूण रुग्णांपैकी १०३ रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. यापैकी १८ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर २ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली आणि एका रुग्णास अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले.
कोरोना नियमांचे पालन करा -
दरम्यान, कोरोनाच्या विविध व्हेरियंटची होणारी बाधा लक्षात घेता. कोरोना नियमाचे काटेकोर पालन करावे. यामध्ये ‘मास्क’चा सुयोग्य वापर, दोन किंवा अधिक व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखणे, नियमितपणे साबण लावून हात धुणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने करण्यात आले आहे. तरी, सर्व मुंबईकर नागरिकांनी या उपाययोजनांची कटाक्षाने व कठोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल व अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.