कोल्हापूर - अल्पवयीन कोरोनाबाधित मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना कोल्हापूरात घडली आहे. कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्या वॉर्डबॉयनेच विनयभंग केला असल्याची माहिती समोर आली आहे. येथील शिवाजी विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमधील कोरोना सेंटरमध्ये ही घटना घडली. संशयित वॉर्ड बॉय विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमेश्वर सतीश कासे (21) असे संशयित आरोपीचे नाव आहे. मुलीच्या वडिलांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.
कोल्हापुरात विलगीकरण कक्षात अल्पवयीन मुलीचा वॉर्डबॉयकडून विनयभंग हेही वाचा -राज्यात आज आठ हजार नव्या रुग्णांसह २४६ मृत्यूंची नोंद; तर सात हजार रुग्णांना डिस्चार्ज..
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन कोरोनाबाधित मुलगी 17 जुलैपासून कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमधल्या कोरोना सेंटरमध्ये दाखल आहे. आज (मंगळवार) दुपारी 4 च्या दरम्यान संशयित आरोपी सोमेश्वर कासे याने यावेळी अलगिकरण केंद्रात जाऊन तिचा विनयभंग केला, शिवाय लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीचे वर्तन केले. पीडित अल्पवयीन मुलीने तत्काळ याबाबत आपल्या आईला घरी फोन करून माहिती दिली.
घरच्यांनी तत्काळ डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमधल्या कोरोना सेंटरमध्ये धाव घेत संबंधित संशयित आरोपीला चोप दिला. शिवाय त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करत घडलेल्या घटनेचे राजारामपुरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सुद्धा घटनेची महिती मिळताच तात्काळ कोरोना सेंटरवर जाऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. त्यानंतर रात्री आठ वाजता राजारामपुरी पोलिसांत संशयित आरोपी सोमेश्वर कासे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.