कोल्हापूर -सोशल मीडियाच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये गुंतून जाऊन आत्महत्या केलेल्या तरुणांचे प्रमाण अधिक आहे. मात्र सोशल मीडियावर मुलींशी संवाद साधताना कोणती काळजी घ्यावी? याकडे मात्र तरुण दुर्लक्ष करत असतानाचे चित्र आहे. एकीकडे अश्लील संवाद करत मायाजाळात फसवणारी तरुणी आणि त्यातून बदनामीची धमकी देत तरुणांकडून पैसे लुटण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे इज्जतीला घाबरून तरुण पैशाची मागणी पूर्ण करतो नाहीतर जीवन संपवून टाकतो. अखेर यावर उपाय काय? यावरचा ईटीव्ही भारतचा हा स्पेशल रिपोर्ट..
हनी ट्रॅप म्हणजे काय?
हनी ट्रॅप म्हणजे मोहात पाडू शकणार्या किंवा आकर्षक व्यक्तीचा वापर करून एखाद्याला जाळ्यात अडकवणे. तसेच विविध कारणांसाठी त्याला ब्लॅकमेल करून त्याचा वापर करून घेणे. या पद्धतीला हनी ट्रॅप असे म्हणतात. हेरगिरीच्या जगात ही संज्ञा सर्वप्रथम वापरली गेली. हनी ट्रॅप हा काही प्रकार नवीन नाही. याचा उपयोग पुराणकाळातही झाल्याचे आढळते. महायुद्धाच्या काळात शत्रू राष्ट्राची माहिती काढण्यासाठी देखील आणि त्याचा वापर करण्यात आला. अशी अनेक उदाहरणे राजकीय, सामाजिक, क्रीडा, कार्पोरेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात.
हे ही वाचा -हनी ट्रॅपला कंटाळून तरुणाने संपवली जीवन यात्रा, कोल्हापूर जिल्ह्यातील घटना
फेसबुक, इंस्टाग्रामवर प्रमाण अधिक -
फेसबुक इंस्टाग्रामवर एखाद्या सुंदर मुलीचा फोटो डिपी ठेवला जातो. त्या माध्यमातून तरुणांना रिक्वेस्ट टाकली जाते. रिक्वेस्ट आल्यानंतर तरुणांना मेसेज केला जातो. याच डीपीला बघून तरुण आकर्षित होतो. संवाद सुरू केल्यानंतर अश्लील संवाद सुरू होतो. येथेच तरुण जाळ्यात अडकून पडतो. हा सर्व प्रकार सध्या फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियाच्या अॅप्लीकेशनवर सर्रास पाहायला मिळतो.
काय काळजी घ्याल?
कोणत्या अॅप्लीकेशनचा वापर कशासाठी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे हनी ट्रॅप कसा लावेल? हे कळणार देखील नाही. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घेणे आवश्यक आहे. एखाद्या अनोळखी मुलीची रिक्वेस्ट एक्सेप्ट करताना काळजी घ्यावी. अनोळखी व्यक्तीशी एका मर्यादेच्या पलीकडे चॅट करण्याच्या मोहात पडू नका. वैयक्तिक माहिती पाठवू नका. कोणी सतत मेसेज करत असेल तर त्याला ब्लॉक करा. तरीही यातून फसवणूक झाली तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा.