कोल्हापूर -गेल्या तीन महिन्यांपासून कोल्हापूररातल्या जयप्रभा स्टुडिओचा ( Jayaprabha Studio Controversy ) मुद्दा गाजत आहे. कोल्हापुरची अस्मिता आणि भालजी पेंढारकर ( Bhalji Pendharkar ) यांच्या कार्याची एकमेव आठवण असलेल्या जयप्रभा स्टुडिओची तब्बल 6 कोटी 50 लाखांना विक्री झाली आणि बघता बघता एक जनआंदोलन ( Agitation For Jayaprabha Studio ) उभे राहिले. गेल्या तीन महिन्यांपासून ठिय्या आंदोलन सुरू असून दररोज विविध आंदोलन सुरू सुरू आहेत. आज सुद्धा चित्रपट महामंडळाचे आंदोलन सुरू आहे. हा स्टुडिओ वाचला पाहिजे, या मागणीसाठी हा लढा सुरू आहे. मात्र, नेमका तिढा काय आहे आणि आंदोलक, शासन आणि ज्यांनी हा स्टुडिओ खरेदी केला त्यांची काय भूमिका आहे यावरच प्रकाश टाकणारा आजचा हा रिपोर्ट.
कोल्हापूरकारांच्या डोळ्यात धूळ फेकून जयप्रभाची विक्री -दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी कोल्हापूरची अस्मिता असलेल्या जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याचे उघड झाले. यापूर्वी सुद्धा कोल्हापुरकरांनी लता मंगेशकर यांच्याविरोधात जाऊन जागा विक्री विरोधात लढा दिला होता. त्याच कोल्हापुरकरांच्या डोळ्यात धूळ फेकत ही जागा दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याचे उघड झाले. या वस्तूची हेरिटेज वास्तू मध्ये समावेश असताना याची विक्री झालीच कशी, असा इथल्या नागरिकांचा सवाल आहे. तर काही आंदोलक याबाबत कायदेशीर पद्धतीने सुद्धा लढा देत आहेत.
ज्यांनी स्टुडिओ खरेदी केला त्यांचे नेमकं काय आहे म्हणणे? - दरम्यान, जयप्रभा स्टुडिओची खरेदी कोल्हापूरातील श्री महालक्ष्मी स्टुडिओज या कंपनीने विकत घेतली. जवळपास साडे सहा कोटी रुपयांना व्यवहार झाला. यामध्ये एकूण दहा भागीदार आहेत. मात्र, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची दोन मुले ऋतुराज राजेश क्षीरसागर आणि पुष्कराज राजेश क्षीरसागर यांचा समावेश असल्याने या प्रकरणाला अजून महत्व प्राप्त झाले. स्टुडिओ विक्रीची बातमी बाहेर पडताच लोकांचा संताप पाहून क्षीरसागर यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत आम्ही हा स्टुडिओ पुन्हा द्यायला तयार आहे. आम्हाला शासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी अट त्यांनी यावेळी घातली आहे. त्यांनी आंदोलनस्थळी सुद्धा भेट देत आंदोलन मागे घ्याबे अशी विनंती केली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याकडील चेंडू शासनाकडे फेकला आहे. त्यामुळे यावर शासन काय निर्णय घेणार हा सुद्धा एक मुद्दा उपस्थित झाला आहे.
पालकमंत्र्यांची नेमकी काय भूमिका -कोल्हापूरवासीयांचा विरोध असताना एका नेत्याच्या मुलाने जागा विकत घेतली, असे विचारले असता पाटील यांनी यापूर्वी प्रतिक्रिया दिली आहे की, 'व्यवसाय करायचा अधिकार प्रत्येकाला आहे. कोणात्यातरी नेत्याचा मुलगा आहे, म्हणून त्याने व्यवसाय करू नये हे योग्य नाही. मात्र, त्यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा राजकीय वाद न करता यातून मार्ग कसा काढता येईल, याबाबत प्रयत्न करण्याची गरज असून त्यादृष्टीने पुढे जाऊ.''शिवाय वाद न वाढवता पुन्हा एकदा जयप्रभा स्टुडिओच्या माध्यमातून लता मंगेशकर आणि भालजी पेंढारकर यांची स्मृती कशी जपता येतील, यादृष्टीने माझे प्रयत्न असतील. शासनस्तरावर विक्री झालेल्या स्टुडिओची किंमत ठरवून ती पुन्हा ताब्यात घेता येते का हे सुद्ध पाहू,' असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले होते.