कोल्हापूर- नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिमंडळाचा विस्तार करत असताना पहिल्यांदाच केंद्रामध्ये सहकार मंत्रालय बनविण्यात आले असून, अमित शाह हे आता केंद्रीय सहकार मंत्री असणार आहेत. खरंतर हे केंद्रात सहकार मंत्रालय सुरू झाल्याने आता त्याचीच सर्वाधिक चर्चा रंगू लागली असून हे मंत्रालय नेमकं कशासाठी? आणि या मंत्रालयामुळे राज्यांमधील अधिकारांवर गदा येणार का? अशा अनेक चर्चाही आता रंगू लागल्या आहेत. अनेकांनी या सहकार मंत्रालयाचे स्वागत केले असून राज्यांचे अधिकार मात्र अबाधित राहिले पाहिजे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने ईटीव्ही भारतने केलेला हा विशेष रिपोर्ट..
ईटीव्ही भारत विशेष : केंद्रीय 'सहकार' मंत्रालयामुळे राज्याच्या अधिकारांवर येणार गदा? - सहकार क्षेत्राला केंद्रीय मंत्रालयाचा फायदा
केंद्र सरकारने सहकार मंत्रालय स्थापन करून त्याची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे दिली आहे. सहकार म्हटलं तर सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्याकडे सर्वांचे लक्ष वेधले जाते. कारण राज्यात सहकाराचे मोठ जाळं निर्माण झाले आहे, ज्या माध्यमातून राज्यातील अनेक जिल्हे समृद्ध बनले आहेत. विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सहकारचे जाळे पसरले आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात साडे चार हजारांहून अधिक सहकारी संस्था आहेत.
देशात सहकार चळवळ वाढायला मदत होईल- जयंत पाटील
केंद्रामध्ये सहकार मंत्रालय सुरू झाल्याने आणि अमित शाह यांच्या नेमणुकीमुळे देशात सहकार चळवळ वाढायला मदत होईल. मी त्यांच्या नेमणुकीचं स्वागतच करतो. पण, त्याचसोबत रिझर्व्ह बँक नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर बंधनं घालतेय, त्यांची स्वायत्तता धोक्यात आलीये. त्यांना अमित शाह सोडवतील, असा आम्हाला विश्वास आहे. देशातल्या बँकिंग व्यवसायावर अन्याय होतोय, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या सहकार मंत्रालया बाबत व्यक्त केले आहे.
नवीन मंत्रालयामुळे अनेक संस्थांवर नियंत्रण; ही आनंदाची बाब : शंकर पाटील
कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष शंकर पाटील यांनी नवीन सहकार मंत्रालयाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना हे खाते यापूर्वीच निर्माण व्हायला हवे होते, असे म्हंटले आहे. शिवाय अनेक सहकारी संस्थांमध्ये घोटाळे होतात, फेरफार होतात त्यावर लक्ष राहण्यासाठी आता हे खाते झाल्याने नियंत्रण राहणार असल्याने ही आनंदाची बाब आहे, सहकार क्षेत्राच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. अनेक संस्थांवर केंद्र सरकारचे योग्य कंट्रोल नव्हते. मात्र आता स्वतंत्र मंत्रालय झाल्याने त्यामध्ये सुधारणा होऊन एक चांगली शिस्त येणार आहे. याआधी सहकारी संस्थांमध्ये अनेक घोटाळे झाल्यानंतर ते निदर्शनास आले आहेत, ते होण्याआधीच त्यावर लक्ष राहणार असल्याचेही शंकर पाटील यांनी म्हंटले आहे. पश्चिम महाराष्ट्र्रात आज जो विकास झाला आहे, त्यामागे सहकार हेच कारण आहे. आता तर केंद्र सरकारकडून याला नवीन मंत्रालयाच्या माध्यमातून पाठबळ मिळणार असेल तर संपूर्ण देशाच्या विकासालाही अधिक चालना मिळणार असल्याचेही त्यांनी म्हंटले.