कोल्हापूर - दिवाळीचा सण संपतानाच थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते. अवकाळी पाऊस आणि त्यात सकाळी पडणाऱ्या थंडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. तर दुसऱ्या बाजूला नागरिकांसाठी बाजारात स्वेटर, शाल, कानटोपी यासारखे अनेक उबदार कपडे खरेदीसाठी दाखल झाले असून येथे ग्राहकांसाठी व्हरायटी दाखल झाली आहे. मात्र, ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळायला हवा तसा मिळत नसल्याने व्यावसायिकच गारठले असल्याचे पाहायला मिळत आहे.
आकर्षक डिझाइनमध्ये स्वेटर उपलब्ध -
दरवर्षी साधारण दिवाळीनंतर थंडी पडण्यास सुरुवात होते. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातील स्वेटर मार्केट येथे बाहेरील राज्यातील अनेक विक्रेते येत आपला माल विकण्यास सुरुवात करतात. यात प्रामुख्याने नेपाळी, तिबेटीयन, कर्नाटक या राज्यातून व्यापारी जास्त येत असतात. हे स्वेटर मार्केट गेल्या अनेक वर्षांपासून येथे चालू आहे. थंडीपासून संरक्षण करणारे तिबेटीयन, गुलाबी, आकाशी, लाल असे विविध स्वेटर, मफलर आकर्षक डिझाइनमध्ये उपलब्ध असतात म्हणून स्वेटर घ्याचे म्हणले की ग्राहकांची पहिली पसंतीदेखील याच दुकानांना असते.
बदलत्या हवामानामुळे ग्राहकांची खरेदीकडे पाठ -
वर्षातील फक्त 4 महिने चालणारा हा व्यवसाय गेली 2 वर्षे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बंद होता. त्यामुळे काही व्यापारी येथे येऊ शकले नव्हते. मात्र, या वर्षी सर्व व्यापाऱ्यांनी गेल्या 1 महिन्यापासून पुन्हा आपली दुकाने चालू करत स्वेटरचे अनेक रंगीबेरंगी व्हरायटी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. परंतु बदलत्या हवामानामुळे गेल्या 2-3 आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे थंडी कमी होत आहे. या हवामानामुळे अनेक ग्राहक बुचकळ्यात पडले आहेत. स्वेटर घ्याचा की रेनकोट तर काही ग्राहकांनी स्वेटर खरेदीकडे पाठ फिरवली असल्याची खंत येथील व्यापाऱ्यांनी 'ईटीव्ही'शी बोलताना व्यक्त केली.