कोल्हापूर -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना भाजपमध्ये येण्याबाबत कोणतीही ऑफर दिली नसल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केला होता. याला मुश्रीफ समर्थकांनी सोशल मीडियातून प्रत्युत्तर दिले आहे. तीन ते चार वर्षापूर्वी कोल्हापुरात झालेल्या एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांनी हसन मुश्रीफ यांना पक्षप्रवेश करण्याचं जाहीर आवाहन केलं होतं. तसेच मुश्रीफ यांनी केलेल्या कामाचं तोंड भरून कौतुकही त्यांनी केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या याच वक्तव्याचा व्हिडिओ सध्या कोल्हापुरात सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
चंद्रकांत पाटील यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ - चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफांना दिली होती भाजपात येण्याची ऑफर -
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना आपण भाजपात येण्यासाठी कोणतीही ऑफर दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी मुश्रीफ यांना भरव्यासपीठावर पाटील यांनी भाजपात येण्यासाठीची ऑफर देणारा व्हिडिओ व्हायरल केला आहे. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कामाचं तोंडभरून कौतुक केल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच तुम्हीही भाजपमध्ये या असेदेखील म्हणताना पाटील यात दिसत आहेत.
- या व्हिडिओत काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील-
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना आम्ही नेहमीच म्हणत असतो, तुमचे नेतृत्व सर्वोदय आहे. तुम्ही अनुभवी आहात, तुम्ही अल्पसंख्याक आहात. ते नेहमी काम करत असतात. त्यांनी आरोग्यविषयक अनेक कामे केली आहेत. पुढचे पाच वर्षे तुमचे सरकार येणार नाही हे कोणत्या ज्योतिषाने सांगायची गरज नाही. म्हणून तर त्यांच्यासाठी पळापळ सुरू आहे. पुढील काळात दहाजण राजीनामे देतील, त्यांची यायची तयारी आहे. पण तुमची देखील तयारी असेल तर तुम्ही आताच भाजपमध्ये या, असे चंद्रकांत पाटील या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत.