कोल्हापूर - डोक्यावर भगवे फेटे, हातात भारताचा ध्वज आणि संविधान बचाव देश बचाव चा नारा देत आज कोल्हापुरात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. सिएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात आज कोल्हापुरात विविध संघटनांनी एल्गार पुकारला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, ज्येष्ठ विचारवंत गणेश देवी, ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.
सीएए, एनआरसी कायद्याविरोधात कोल्हापुरात विविध संघटनांचा मोर्चा
कोल्हापुरात सिएए एनआरसी आणि एनपीआर कायद्याविरोधात विविध संघटनांनी मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, ज्येष्ठ विचारवंत गणेश देवी, ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, महापौर निलोफर यांनी केले.
कोल्हापूरच्या दसरा चौकात हजारो नागरीक एकत्र जमले होते. कोणी भगवे फेटे, कोणी हातात तिरंगा झेंडा तर कोणी फलक घेऊन या मोर्चात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या मोर्चात महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. एनआरसी कायद्याविरोधात भर उन्हातही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी संविधान बचाव देश बचाव चा नारा देत महाराष्ट्र सरकारने एनआरसी आणि सीएए कायद्याला महाराष्ट्राचा पाठिंबा नाही असे घोषित करावे अशी मागणी सुद्धा ज्येष्ठ विचारवंत गणेश देवी यांनी केली. दरम्यान या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.