कोल्हापूर :राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर काल काही एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. मात्र, हा हल्ला म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचा रोष होता, असे आमदार सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. गेली पाच महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे. मात्र या पाच महिन्यात महाविकास आघाडी सरकारने नुसता वेळकाढूपणा केल्याचे त्यांनी म्हटले आहे. जर लागलीच त्यावर काहीतरी निर्णय किंवा तोडगा निघाला असता तर, आज एसटी कर्मचाऱ्यांवर ही वेळ आली नसती शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणे हे निषेधार्य आहेच. आम्ही या गोष्टीचे समर्थन करत नाही. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी देखील न्यायालयावर विश्वास ठेवून त्यांनी दिलेला निर्णय हा मान्य करायला हवा होता, असे ते म्हणाले आहेत. तसेच हे आंदोलन आता भरकटलेलं असून, आंदोलनास कोणतीही दिशा राहिलेली नाही. याचं नेतृत्व करणारे देखील त्यांना भडकवत असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर केली आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते.
एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दिशाहीन :२६ ऑक्टोंबर २०२१ पासून एसटी कर्मचारी आंदोलनावर गेले आहेत. राज्यशासनात विलीनीकरण ही त्यांची प्रमुख मागणी धरून गेली 5 ते 6 महिने कर्मचारी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. मात्र काल अचानकपणे एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावर हल्ला केला. हे योग्य नाही. याचं आम्ही समर्थन करत नाही, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. तसेच राज्य सरकारवर टीका देखील केली आहे. ते म्हणाले, गेल्या 5 महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र याकडे सरकारने दुर्लक्ष केले. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी काल आपला रोष व्यक्त केला आहे. जर सरकारने अगोदरच योग्य मार्ग काढून पुढील दिशा कर्मचाऱ्यांना सांगितले असती तर, ही वेळ आली नसती. तसेच सध्या सुरू असलेले आंदोलन दिशाहीन असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याचे नेतृत्व करणार्या कर्मचार्यांना भडकवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी ऐकायला हवे, असे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे.