कोल्हापूर - राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज सायंकाळपर्यंत उघडण्याची शक्यता आहे. धरण पूर्णपणे भरले असून जलसंपदा विभागाचे सर्वच अधिकारी कर्मचारी यावर लक्ष ठेऊन आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राधानगरी धरण कधी भरणार यावर सर्वांच्या नजरा लागून आहेत. मात्र आता धरण जवळपास पूर्ण भरले असून सायंकाळी कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडून विसर्ग सुरू होऊ शकतो. राधानगरी धरणाची आज 25 जुलै रोजी सकाळी 12 वाजता पाणी पातळी 347.16 फुटांपर्यंत पोहीचली असल्याची माहिती शाखा अभियंता समीर निरुखे यांनी दिली आहे.
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत किंचित वाढ होण्याची भीती
सध्या पावसाचा जोर ओसरल्याने पंचगगा नदीची पाणी पातळी ओसरली असून जवळपास 52 फुटांवर पाणी पातळी आहे. शुक्रवारी रात्री पाण्याची पातळी 56.3 फुटांवर गेली होती. मात्र आता राधानगरी धरण पूर्णपणे भरले असून त्याचे स्वयंचलित दरवाजे सुद्धा आज सायंकाळपर्यंत उघडण्याची शक्यता आहे. अद्यापही 4 इंच इतकी पाणी पातळी वाढण्याची गरज असून केवळ 1 किंव्हा 2 दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत किंचित वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मोठा फरक पडणार नसला तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यासह राधानगरी धरण क्षेत्रात सुद्धा पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे आता सर्वांचेच याकडे लक्ष लागून आहे.
जलसंपदा विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे सुयोग्य नियोजन
खरंतर जिल्ह्यात राधानगरी धरण भरलं नसतानाही 2019 पेक्षाही मोठा महापूर आला. पुन्हा एकदा अनेकांना याचा मोठा फटका बसला आहे. मात्र यामध्ये यावर्षी जलसंपदा विभागाने महत्वाची भूमिका पार पाडली आहे. कारण ऐन उन्हाळ्यात राधानगरी धरणातील पाण्याचा विसर्ग करून आणि आगामी काळात पावसाचा अंदाज घेऊन आधीच धरणातून विसर्ग सुरू केला होता. शिवाय वेळोवेळी जिल्ह्यातील सर्वच मंत्री याचा आढावा घेत होते. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून तर जलसंपदा विभागाचे अधिकारी कर्मचारी धरणातील पाणीपातळी वर लक्ष ठेऊन आहेत. पावसाचा जोर पाहून सर्व अधिकारी गेले 8 दिवस घरी सुद्धा न जाता धरणावरच वस्ती करून आहेत. धरणाच्या सुयोग्य नियोजनामुळे यावर्षी पूर परिस्थितीवर काही प्रमाणात तरी नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. मात्र पावसाचा जोर पाहता आणि धरणाचे दरवाजे न उघडताच जिल्ह्यात पुन्हा एकदा महाप्रलयकारी पुराचे संकट आले आहे.