कोल्हापूर कोल्हापूर विमानतळाचा Kolhapur Airport विस्तार आणि येथील विकासकामे वेगाने सुरू आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे येथे सुरू असलेल्या वर्ल्ड क्लास टर्मिनल बिल्डिंगचे World Class Terminal Building काम होय. सध्या याचे 60 टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या 31 मार्च 2023 पर्यंत याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरण विभागाकडून देण्यात आली आहे. या बिल्डिंगला एक ऐतिहासिक लूक देण्यात आला असून, राजवाडा, गडकिल्ल्यांच्या वास्तूप्रमाणे ही बिल्डिंग बनविण्यात येत आहे. पत्रकाद्वारे ही माहिती आज देण्यात आली आहे. पाहुयात यावरचे हे सविस्तर वृत्त.....
मोठ्या प्रमाणात कामे सुरू कोल्हापूर विमानतळावरून सध्या ज्या मार्गांवर विमानसेवा सुरू आहे, त्या सर्वच विमानसेवा अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. त्याला प्रवाशांचा प्रतिसादसुद्धा मोठा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथे विविध विकासकामे सुरू आहे. म्हणूनच नव्या ऐतिहासिक पद्धतीची टर्मिनल बिल्डिंग तसेच धावपट्टी रुंदीकरण, एटीसी टॉवर, फायर स्टेशन, आयसोलेशन बे आणि विविध कामे सुरू आहेत. कोट्यवधींचा यासाठी खर्च होणार आहे.
उडाण योजनेअंतर्गत कोल्हापुरात विमानसेवा उडाण योजनेअंतर्गत येथे चांगल्या पद्धतीने विमानसेवा सुरू आहे. सद्य:स्थितीत कोल्हापूर-हैदराबाद, कोल्हापूर-बंगळुरू, कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा सुरू आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे कोल्हापूर-मुंबई सुरू नव्हती, तीसुद्धा लवकरच सुरू होणार आहे. शिवाय आणखी काही नवीन मार्गांवर विमानसेवा सुरू करण्याबाबतसुद्धा प्रयत्न सुरू आहेत. सध्या नाईट लँडिंगसुद्धा परवानगी मिळाल्याने आता 24*7 विमानसेवा सुरू करण्याबाबत काहीही अडचण नाही आहे.