कोल्हापूर - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (CM K Chandrashekhar Rao) यांनी सपत्नीक अंबाबाईचे दर्शन (Ambabai Darshan) घेतले. आज सकाळी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी अंबाबाई मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर दररोज दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या आरतीलासुद्धा ते थांबले. विशेष म्हणजे, तब्बल पाऊण तासांहून अधिक वेळ ते मंदिरात होते. यावेळी त्यांनी देवीच्या डोक्यावरच वरच्या मजल्यावर असलेल्या मातृलिंग मंदिरात (Matruling Temple) जाऊन दर्शन घेतले आणि त्याची सविस्तर माहितीही घेतल्याचे देवस्थानचे सचिव शिवराज नायकवडे यांनी सांगितले.
दुसऱ्या मजल्यावरील मातृलिंग मंदिराचीही घेतली माहिती :आजपर्यंत जेवढे मंत्री किंवा नेते आले त्यातील क्वचितच कोणी इथल्या मातृलिंग मंदिराबाबत माहिती घेतली आहे. मात्र, आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मंदिराबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. शिवाय मंदिरात देवीच्या डोक्यावरच वरच्या मजल्यावर असलेल्या मातृलिंग मंदिराचीसुद्धा माहिती घेतली. केवळ अंबाबाई दर्शनासाठी ते कोल्हापुरात आले होते. त्यामुळे तब्बल पाऊण तासांहून अधिक वेळ त्यांनी मंदिरात घालवला. शिवाय दुपारची आरती झाल्यानंतर मातृलिंगाचे सपत्निक दर्शन घेतले. यावेळी त्यांचे इतर नातेवाईक तसेच पदाधिकारी आदी उपस्थित होते, अशी माहिती कोल्हापुरातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी दिली.
देशातील एकमेव असे दुसऱ्या मजल्यावरील मातृलिंग मंदिर :साडे तीन शक्तिपीठांपैकी एक पीठ अशी करवीर निवासिनी आई अंबाबाईची ओळख आहे. चालुक्यांच्या काळात इ.स. 700 च्या आसपास म्हणजेच सुमारे 1200 वर्षांपूर्वीचे हे अतिप्राचीन मंदिर! मंदिरात अनेक छोटी छोटी मंदिरं देखील आहेत. मात्र यातील काही मंदिरं वर्षातून ठराविक वेळीच उघडली जातात. मंदिराच्या बांधणी आणि रचनेत अनेक वैशिष्ट्य आढळतात. अनेक वैशिष्टयांपैकी महत्वाचं म्हणजे मातृलिंग मंदिर. अनेकांना हे कुठे आहे ते माहिती नाही. तर अनेकांना त्याबद्दल माहितीच नाही. वर्षांतून केवळ 3 वेळा श्रावणी सोमवार, वैकुंठ चतुर्थी, महाशिवरात्री आणि दररोज साडे बारा वाजता आरती होत असते. त्या आरतीवेळी काही काळासाठी या मंदिराचा दरवाजा उघडला जातो. अंबाबाई मंदिराच्या अंतर्गत रचनेत दोन मजले करण्यात आले आहेत. खाली गाभाऱ्यात करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती असून तिच्या डोक्यावरच म्हणजेच वरच्या मजल्यावर मातृलिंग मंदिर आहे. त्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी दर्शन घेतले.