कोल्हापूर - देशामध्ये महागाईने सर्वसामान्य नागरिक हैरान झाले आहेत. अनेकांना जीवन जगणंही अवघड बनले आहे. पेट्रोल डिझेलचे दर तर गगनाला भिडले आहेत. शिवाय गॅसचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हमीभावाच्या बाबतीतही तेच, शिवाय एक मार्चपासून रासायनिक खतांच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा आता झळा बसू लागल्या आहेत, म्हणूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाचा भडका उडवणार असल्याची घोषणा केली आहे. स्वतः संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या आंदोलनाची घोषणा केली आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विजबिलावरून राज्य सरकारला सवाल
यावेळी पत्रकार परिषदेत माजी खासदार शेट्टी यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीजबिल माफ करायला सरकारला काय अडचण होती? केंद्र सरकारवर आमची नाराजी असली तरी राज्य सरकारचे कामकाजही फार समाधानकारक नाही. राज्य सरकारसुद्धा शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिल्याचे चित्र दिसत नाही, असे त्यांनी यावेळी म्हटले. शिवाय कोणत्याही परिस्थितीत या सर्वच प्रश्नांना न्याय मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही म्हणत लवकरच आंदोलनाचा भडका उडवणार असून याबाबत व्ह्यूवरचना सुद्धा आठवडाभरात आखली जाणार असल्याचे त्यांनी म्हंटले.