कोल्हापूर - शेतीला सलग 10 तास वीज द्या, यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर येथील वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरूवात केली. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा निर्धार त्यांनी केला आहे. दरम्यान, शेट्टी यांनी स्वतः येथील महावितरण कार्यालयासमोर रात्रभर ठिय्या आंदोलन केले. आजपासून हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.
राजू शेट्टी यांचे कोल्हापुरात आंदोलन आता कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही - शेट्टी
बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून शेतीला दिवसा 10 तास विनाकपात वीज द्या, शेतीपंपाच्या वीज बिलांची तत्काळ दुरूस्ती करावी, शेतीपंपाची कनेक्शन तोडणे त्वरीत थांबवावे, अन्यायी वीज बील वसुली थांबवावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांची वेळोवेळी फसगत करत आली आहे. फसवी व चुकीची वीज बिलांची वसुली आम्ही कदापि सहन करणार नाही. वीज वितरण कंपनीकडून लूट सुरू आहे. किती वेळा आम्ही सहन करायचे? मंत्रीमंडळातील मंत्र्यांनीच छुप्या पध्दतीने वीज कंपनीतील कंत्राटे घेतली आहेत. एका बाजूला घरगुती वीज ग्राहकांची लूट करायची तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना वीज कनेक्शन साठी नागवायचे. ही पध्दत कंपनीने अवलंबली आहे असेही शेट्टींनी म्हंटले. यावेळी शेट्टी यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत. यामध्ये प्रदेशाध्यक्ष प्रा. जालधंर पाटील, जनार्दन पाटील, सावकर मादनाईक, विठ्ठल मोरे, जयकुमार कोले, रामचंद्र फुलारे, वैभव कांबळे, रमेश भोजकर, सागर संभूशेटे, अजित पवार, सागर कोंडेकर आदी सहभागी झाले आहेत.
हेही वाचा -Sharad Pawar on Nawab Malik : 'सरकार विरोधात जाहीर भूमिका मांडणाऱ्यांना त्रास दिला जातोय'