कोल्हापूर- कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. त्याचा फटका कोल्हापूर, सांगलीसह सीमाभागातील गावांना बसण्याची दाट शक्यता आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास पावसाळ्यात सांगली कोल्हापुरातील अनेक गावे पाण्याखाली जाण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी अलमट्टीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज(रविवारी) कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांची भेट घेणार आहेत. याबाबत स्वत: राजू शेट्टी यांनी शनिवारी कोल्हापुरात माहिती दिली.
अलमट्टी धरणासंदर्भात राजू शेट्टी घेणार कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट
कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला मोठा फटका बसणार आहे. सध्या नरसिंहवाडीचा पाण्याचा तळ ५१९ मीटर इतका उंचीवर आहे. जर अलमट्टीची उंची 5-6 मीटरने वाढवली तर कृष्णेच्या नरसिंहवाडीतील तळ हा ५२४ मीटर वर जाईल. परिणामी नरसिंह वाडीत अलमट्टीचे बॅक वाटर 5 मीटर उंचीने वाढेल आणि संपूर्ण क्षेत्र पाण्याखाली जाईल, अशी भीती शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
तसेच कोल्हापूर सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यास महापुराचा लोंढा डोंगरापासून नरसिंह वाडीपर्यंत वेगाने येतो. मात्र नरसिंह वाडीपासून दोनशे बत्तीस किलोमीटर अंतरावरील अलमट्टी धरणा पर्यंतचा पाण्याचा प्रवास संथ गतीने होतो. कारण नृसिंह वाडीपासून पुढे जमिनीचा उतार केवळ काही मिटरने उतरत जातो, असेही शेट्टी म्हणाले.
प्रादेशिक राजकारणाचा त्रास सर्वसामान्य जनतेला नको-
जर अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवली तर नृसिंहवाडी पासून 232 किलोमीटरवर असणाऱ्या अलमट्टी धरणाचा पर्यंतचा उतार 0 मीटर असणार आहे. त्यामुळे महापुराचे पाणी हे संथ गतीने पुढे प्रवाहित होणार आहे. मात्र कोल्हापूर आणि सांगली शहराला डोंगरात येणाऱ्या पाण्यापासून मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती शेट्टी यांनी व्यक्त केली. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. त्यामुळे केंद्रीय जल आयोग महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सरकार यांनी याचा विचार केला पाहिजे. प्रादेशिक राजकारण आणि पाणीवाटपाच्या राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये याचा विचार केला पाहिजे. कारण हा त्रास केवळ कोल्हापूर आणि सांगलीला होत नाही तर कर्नाटक मधील सीमाभागात असणाऱ्या गावांना देखील होतो, याकडेही शेट्टी यांनी यावेळी लक्ष वेधले.
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई हे आज (रविवार 26 सप्टेंबर)ला बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी त्यांची भेट घेऊन या गोष्टी निदर्शनास आणून देणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने समन्वय राखला पाहिजे. पावसाळ्यापूर्वी ऑगस्टपर्यंत कर्नाटक सरकारने 526 मीटर पर्यंत पाणी साठवले, तर त्याचा फटका पुढील काही दिवसात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला बसणार आहे. जर उंची वाढवून साठा वाढवला तर धोका अधिक आहे,असे शेट्टी म्हणाले.
हेही वाचा - जर 'हा' धोका टाळायचा असेल तर... फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
हेही वाचा - कृष्णा पाणी वाटप; आंध्र, तेलंगणाच्या मागणीला महाराष्ट्र, कर्नाटकचा विरोध