कोल्हापूर - भाजपाच्या ट्वीट नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तत्काळ दूध दरवाढीसाठी आंदोलन पुकारले आहे. दुधाचे दर उतरले आहेत. जवळपास 22 रुपये इतका सध्या दुधाला दर मिळत आहे. फडणवीस सरकारच्या काळात तो 32 रुपये इतका होता. दर इतके कमी झाले असताना राजू शेट्टी गप्प का? असा सवाल भाजपाने ट्विटरच्या माध्यमातून विचारला होता. त्यावर शेट्टी यांनी विचार करत येत्या 21 जुलै रोजी राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलन पुकारले आहे. राज्यात कोणीही 21 जुलै रोजी दूध डेअरीवर दूध घालू नका असे, आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.
आंदोलनाबाबत माहिती देताना शेट्टी म्हणाले की, सध्या दुधाचे दर 18 ते 20 रुपयांनी उतरले आहेत. दुधाचा उत्पादन खर्चच 28 रुपयांपर्यंत येतो. त्यामुळे हे दर दूध उत्पादक शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाही. अजून किती दिवस तोट्यामध्ये दुधाचा व्यवसाय करायचा, हा दूध उत्पादकांसमोर प्रश्न आहे. तामिळनाडूमध्ये दुधासाठी मोठे आंदोलन सुरू आहे. गुजरात आणि उत्तरप्रदेशमध्ये सुद्धा आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दूध उत्पादकांनी सुद्धा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले.
हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष : 'आत्मनिर्भर' बनत त्याने शोधली स्वयंरोजगाराची वाट!