कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान द्या, अन्यथा दूध उत्पादकांची जनावरे सरकारनेच सांभाळावीत, असा इशारा त्यांनी दिला असून 17 ऑगस्टला सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मोर्चाची घोषणा शेट्टींनी केली आहे. विशेष म्हणजे शेतकरी जनावरांसह या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
राज्य आणि केंद्र सरकार दूध प्रश्नावर उदासिन
स्वाभिमानी संघटना दूध दरप्रश्नावर सातत्याने आवाज उठवत आहे. गेल्याच महिन्यात राज्यभर दूध बंद आंदोलन करण्यात आले. मात्र आद्यपही सरकारने याकडे लक्ष दिले नाही. दूध दरप्रश्नी केंद्र आणि राज्य सरकारला पत्रव्यवहार केला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दुग्धविकासमंत्री सुनील केदार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांना सुद्धा पत्र लिहिले.
शरद पवार यांच्यासोबत फोनवरुन बोललो. एव्हढेच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केला. पण दुर्दैवाने अद्याप याबाबत काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे नाईलाजाने आता आंदोलन तीव्र करावे लागत आहे. आता तातडीने राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच रुपये दराने एकूण रक्कम जमा करण्याची आवश्यकता असून याबाबत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या
केंद्राने २३ जूनला दहा हजार टन दूध भुकटी आयात करण्याचा जो निर्णय घेतलाय, तो तातडीने मागे घ्यावा.
निर्यातीसाठी सबसिडी द्यावी
दुग्धजन्य पदार्थावरील पाच टक्के, १२ टक्के, १८ टक्के असलेली जीएसटी मागे घ्यावी. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांच्या किंमती कमी होतील. ग्राहकांनाही दिलासा मिळेल. अतिरिक्त दुधाचा प्रश्न निकालात निघेल.