महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

..तर जयप्रभाची जागा द्यायला तयार; राज्य शासनाने पुढाकार घ्यावा - क्षीरसागर - जयप्रभा स्टुडिओ वाद कोल्हापूर

जनभावनेचा विचार करून ही जागा राज्य शासन खरेदी करायला तयार असल्यास कायदेशीर पद्धतीने त्यांनी ही जागा विकत घ्यावी. मी स्वतः यामध्ये लक्ष घालून द्यायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर ( Rajesh Kshirsagar comment on Jayaprabha Studio ) यांनी व्यक्त केली आहे.

Rajesh Kshirsagar comment on Jayaprabha Studio
जयप्रभा स्टुडिओ वाद कोल्हापूर

By

Published : Feb 12, 2022, 4:12 PM IST

Updated : Feb 12, 2022, 9:43 PM IST

कोल्हापूर - जयप्रभा स्टुडिओ खरेदीबाबत मी अनभिज्ञ आहे. मात्र, माझी मुले ऋतुराज आणि पुष्कराज सुज्ञ आहेत. त्यांना कोणतीही खासगी जागा विकत घेण्याचा अधिकार आहे. मात्र, जनभावनेचा विचार करून ही जागा राज्य शासन खरेदी करायला तयार असल्यास कायदेशीर पद्धतीने त्यांनी ही जागा विकत घ्यावी. मी स्वतः यामध्ये लक्ष घालून द्यायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर ( Rajesh Kshirsagar comment on Jayaprabha Studio ) यांनी व्यक्त केली आहे.

माहिती देताना राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर

हेही वाचा -Chhatrapati Sambhaji Maharaj Birthday : संयोगीताराजेंकडून संभाजीराजेंना वाढदिवसानिमित्त हटके शुभेच्छा

जयप्रभा स्टुडिओची जागा ज्या महालक्ष्मी स्टुडिओने खरेदी केली यामध्ये क्षीरसागर यांच्या दोन मुलांचा सुद्धा सहभाग आहे. त्यामुळे, त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवाय राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि मला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचेही त्यांनी म्हटले.

काय म्हणाले राजेश क्षीरसागर?

राज्यघटनेने प्रत्येकाला जागा खेरेदी विक्रीचा अधिकार दिला आहे. माझी मुले सुद्धा सुज्ञ आहेत. एक मुलगा बीई सिव्हील झाला आहे. त्याचा बांधकाम व्यवसाय असल्याने त्याने ही जागा विकत घेण्यामध्ये सहभाग घेतला. मात्र, मी कोल्हापुरातील नागरिकांच्या भावनेचा आदर करतो. ही जागा केवळ संगीत आणि नाट्य यासाठीच वापरली जावी, हेच माझेही मत आहे. शिवाय, राज्य शासन जर ही जागा विकत घ्यायला तयार असेल तर, केव्हाही ही जागा द्यायला तयार असल्याचेही क्षीरसागर यांनी म्हटले. शिवाय इतर जे काही लोक यामध्ये आहेत त्यांनी विरोध केला तर, मी स्वतः रस्त्यावर उतरून राज्य शासनाला देण्याबाबत लढा देईल, असेही क्षीरसागर यांनी म्हटले.

राजकीय पोळी भाजून मला बदनाम करण्याचा प्रयत्न

दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावरच आशा पद्धतीने माहिती येते हे म्हणजे एका राजकीय नेत्याकडून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी क्षीरसागर यांनी म्हटले. शिवाय गतवेळच्या निवडणुकीवेळी सुद्धा असाच बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, कोल्हापुरातील जनता सुज्ञ आहे, त्यांना हे नक्की समजेल, असेही त्यांनी म्हटले.

कोल्हापूरची अस्मिता आणि भालजी पेंढारकर यांच्या कार्याची एकमेव आठवण

कोल्हापूरची अस्मिता आणि भालजी पेंढारकर यांच्या कार्याची एकमेव आठवण असलेल्या जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याची माहीती समोर आली आहे. 15 फेब्रुवारी 2020 मध्येच जयप्रभा स्टुडिओची ही जागा तुकडे पाडत अनेकांना विकल्याचे समोर आले आहे. 6 कोटी 50 लाखांना हा व्यवहार झाला. मात्र ज्या कोल्हापूरकरांनी लता मंगेशकर यांच्याविरोधात जाऊन जागा विक्री विरोधात लढा दिला होता. त्याच कोल्हापूरकरांच्या डोळ्यात धूळ फेकत ही जागा दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याचे उघड झाले आहे.

अनेक वर्षांचा लढा अन् सर्वांना अंधारात ठेऊन जयप्रभा ची विक्री

जयप्रभा स्टुडिओ आणि येथील एकूण 13 एकर जागा भालजी पेंढारकर यांनी विकत घेतली होती. त्यामध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले. अनेक दिग्गज कलाकार याठिकाणी येऊन गेले. अनेकांच्या करिअरची सुरुवात या जयप्रभा स्टुडिओमधूनच झाली. सर्वकाही ठीक सुरू होते. त्याच काळात महात्मा गांधी यांची हत्या झाली आणि त्याचे पडसाद संपूर्ण देशभर पाहायला मिळाले. याच वेळी जयप्रभा स्टुडिओ सुद्धा जाळण्यात आला. यात स्टुडिओचे प्रचंड नुकसान झाले. भाजलींनी आपल्या कमाईचे सर्व पैसे जयप्रभा पुन्हा उभा करण्यासाठी लावले. शिवाय अनेक ठिकाणहुन कर्जही काढले. मात्र पुढे त्यांच्या डोक्यावर कर्ज झाल्याने शेवटी हा स्टुडिओ त्यांनी त्यांच्या जवळच्या असणाऱ्या मंगेशकर कुटुंबाला विकायचे ठरवले आणि लता मंगेशकर यांनी त्यांच्याकडून हा स्टुडिओ आणि 13 एकर जागा विकत घेतली. विकताना या ठिकाणी केवळ चित्रपट निर्मितीचे काम सुरू राहावे अशी अट त्यांनी घातली होती. त्यानुसार चित्रपट निर्मितीचे काम सुरू राहीले. तेवढ्यात भालजी पेंढारकर यांचे निधन झाले आणि पुढे जयप्रभा स्टुडिओमध्ये चित्रपट निर्मितीचे काम सुद्धा थांबले. पुढे कित्येक वर्षे हा स्टुडिओ बंदच होता.

पुढे लता मंगेशकर यांनी एकूण 13 एकर जागेपैकी साडे नऊ एकर जागा विकासकाला विकली. त्या ठिकाणी सध्या मोठ्या इमारती उभ्या आहेत. मात्र त्यातील उरलेली साडेतीन एकर जागा तशीच होती. पुढे महानगरपालिकेने शहरातील अनेक जागा, वास्तू हेरिटेज वास्तू मध्ये नोंद केल्या. यामध्ये जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा सुद्धा समावेश होता. लता मंगेशकर या निर्णयाविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्या. मात्र मंगेशकर यांच्या या भूमिकेनंतर संतापलेल्या कोल्हापूरकरांनी मात्र आंदोलन पुकारले. शिवाय जिथे चित्रपटांचा पाया रचला गेला त्या जागेची पुढे जाऊन विक्रीच होणार यामुळे ही जागा अशीच राहावी अशी विनंती सुद्धा कोल्हापूरकरांनी केली. यासाठी मोठे आंदोलन उभे राहिले, अनेक वर्षे ते चालले. महापालिकेला पाठिंबा देत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने सुद्धा यामध्ये सहभाग नोंदविला. शेवटी 2017 झाली लता मंगेशकर यांनी स्वतः सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली होती. मात्र त्यानंतर सर्वांनाच अंधारात ठेऊन पुन्हा ही जागा विक्रीची प्रक्रिया सुरू केली आणि 2020 मध्ये ज्यावेळी जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू होता त्याच्या सुरुवातीलाच जागेची विक्री झाल्याचे समोर आले आहे. एकूण 6 कोटी 50 लाखांना कोल्हापूरातील जुना वाशी नका येथील एका भागीदारी फर्मने ही जागा विकत घेतली असून यामध्ये अनेकांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. यात शहरातील एका राजकीय नेत्याच्या दोन मुलांचा सुद्धा सहभाग आहे.

पुन्हा आंदोलन उभं राहण्याची शक्यता-

एकीकडे या जागेची विक्री झाली असून सुद्धा अनेकांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. कोणत्याही परिस्थितीत जयप्रभा स्टुडिओ विक्री करू देणार नसल्याचा कोल्हापूरकरांनी इशारा दिला होता. मात्र सर्वांना अंधारात ठेऊन याची विक्री झाली त्यामुळे संतापलेल्या कोल्हापूरकरांकडून पुन्हा आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.

राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदेंना लिहिले पत्र

जयप्रभा स्टुडिओबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह महानगरपालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांना पत्र लिहिले आहे. पत्राच्या माध्यमातून त्यांनी श्री. महालक्ष्मी स्टुडिओला पर्यायी जागा द्यावी आणि जयप्रभा स्टुडिओची जागा शासनाच्या ताब्यात घेऊन त्याचे संवर्धन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

काय म्हटले आहे पत्रात

पत्र
पत्र

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मंत्री एकनाथ शिंदे तसेच, महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी महालक्ष्मी स्टुडिओज फर्मच्या भागिदारांशी चर्चा केली. त्यांनी ही जागा शासनाला परत द्यायला सकारत्मकता दर्शवली आहे. त्यांनी रीतसर कायदेशीर मार्गाने ही जागा खरेदी केली आहे. मात्र, जनतेच्या भावना समजून त्यांनीसुद्धा जागा परत द्यायला होकार दर्शवला आहे. त्यानुसार जयप्रभा स्टुडिओची जागा घेऊन त्या बदल्यात आपण इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी आणि जयप्रभा स्टुडिओच्या जागेचे संवर्धन व्हावे, अशीही मागणी क्षीरसागर यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण ?

कोल्हापूरची अस्मिता आणि भालजी पेंढारकर यांच्या कार्याची एकमेव आठवण असलेल्या जयप्रभा स्टुडिओची दोन वर्षांपूर्वीच विक्री झाल्याची माहिती आज समोर आली. 15 फेब्रुवारी 2020 मध्येच जयप्रभा स्टुडिओची ही जागा तुकडे पाडत अनेकांना विकल्याचे समोर आले आहे. येथील श्री. महालक्ष्मी स्टुडिओ या फर्मने 6 कोटी 50 लाखांना हा व्यवहार केला असल्याचे आज समजले. यामध्ये राजेश क्षीरसागर यांच्या दोन मुलांसह एकूण 10 जणांच्या भागिदारीत ही जागा घेतल्याची माहिती समोर आली. दरम्यान, ज्या कोल्हापूरकरांनी लता मंगेशकर यांच्याविरोधात जाऊन जागा विक्री विरोधात लढा दिला होता, त्याच कोल्हापूरकरांच्या डोळ्यात धूळ फेकली असल्याचे म्हणत कोल्हापूरकर पुन्हा संतापले आहेत. शिवाय तीव्र लढ्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. त्यानंतर आज क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून पर्यायी जागा देण्याबाबत मागणी केली आहे. त्यामुळे, शासन तसेच महानगरपालिका आता नेमकी काय भूमिका घेणार? हेच पाहावे लागणार आहे.

हेही वाचा -Rajesh Tope on Wine Sale : वाईनबाबत डॉक्टारांनी सांगितले आहे, प्रमाणात असेल तर योग्य- राजेश टोपे

Last Updated : Feb 12, 2022, 9:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details