कोल्हापूर - राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून संजय पवार तर भाजपकडून धनंजय महाडिक यांच्यात सरळ लढत होणार हे आता स्पष्ट झाले. एकीकडे राज्यसभेची निवडणूक असली तरी दोन्ही उमेदवार कोल्हापूरचे असल्याने यामध्ये आता अधिकच रंगत आली आहे. संजय पवार हे अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर काम करत आहेत. तर दुसरीकडे धनंजय महाडिक हे कोल्हापुरातील राजकारणातील मातब्बर नाव आहे. खरंतर दोन्ही पक्षांकडे निवडून येण्यासाठी पुरेशी मते नाहीत. तरीही दोन्ही बाजुंनी विजयाचा दावा केला जात आहे. या सगळ्या निवडणुकीत सतेज उर्फ बंटी पाटील हे सुद्धा आता अॅक्टिव्ह झाले आहेत.
राज्यसभेच्या निवडणुकीत सतेज पाटीलही लावणार ताकद पणाला ? -गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरच्या राजकारणात पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आणि भाजपचे प्रवक्ते माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक ही दोन व्यक्तींची नावे महत्वाची आहेत. याचे कारण सुद्धा सर्वश्रुत आहे. म्हणूनच आता संजय पवार यांच्या विरोधात धनंजय महाडिक हे नाव येताच सतेज पाटील अॅक्टिव्ह झाल्याचे बोलले जात आहे. संजय पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे पाटील यांनी विशेष लक्ष घातले आहे. नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोट निवडणुकीत अगदी खालच्या पातळीवर टीका करण्यात आल्या होत्या. अगदी कौटुंबिक मुद्दे सुद्धा या निवडणुकीत काढण्यात आले. त्यामुळे महाडिक आणि पाटील गटातील संघर्ष आणखीनच वाढल्याचे दिसून आले. एकदा पराभव झाल्याने प्रत्येक निवडणुकीत अगदी ताकदीने सामोरे जायचे सतेज पाटील यांनी ठरवले आहे. मागील 8 ते 9 निवडणुका सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या या निवडणुकीत सुद्धा सतेज पाटील सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.