कोल्हापूर - आज सलग सहाव्या दिवशी कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन ( ST Employees Strike ) सुरूच आहे. एसटी महामंडळ बरखास्त करून त्याचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आज सहाव्या दिवशी कर्मचाऱ्यांनी भजन आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. येत्या सोमवारी कार्तिकी एकादशी आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भाविक पंढरपूरला जात असतात. त्यामुळे त्याच्या आधीच सरकारने यावर तोडगा काढून एसटी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली.
प्रवाशांनीही आम्हाला समजून घ्यावे; हे सर्व आपल्याही चांगल्यासाठीच :
गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापुरातील एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहे. अनेकांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. याबाबतच बोलताना कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष उत्तम पाटील म्हणाले, आम्हालाही मान्य आहे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मात्र, आमचेही समजून घ्यावे. महामंडळाचे जर राज्य सारकारमध्ये विलीनीकरण झाले तर प्रवाशांच्याही चांगल्याचे आहे. प्रवाशांना अधिक सोयी सुविधा मिळू शकतात. त्यामुळे त्यांनीही समजून घ्यावे, असेही त्यांनी आवाहन केले.