कोल्हापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. याच दरम्यान अत्यावश्यक असणाऱ्या अनेक किराणा दुकानदारांनी मालाच्या किंमती वाढवून ग्राहकांची अक्षरशः लूट केली. याबाबत राज्यभरात अनेक ठिकाणी तक्रारीसुद्धा आल्या होत्या. दुसरीकडे लॉकडाऊन होणार आणि बाहेर पडता येणार नाही, या कारणाने अनेकांनी आपापल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात किराणा बाजार भरून ठेवला. परिणामी, मागणी वाढली आणि पुरवठा कमी पडू लागल्याने बाजारातील डाळी, कडधान्य, खाद्यतेल आदी वस्तूच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
माहिती देताना घाऊक व्यापारी आणि नागरिक हेही वाचा -कोल्हापुरात व्यापारी आणि प्रशासनात संघर्ष; व्यापारी दुकाने उघडी ठेणवण्याच्या निर्णयावर ठाम
डाळीचे दर वाढण्यामागे व्यापाऱ्यांचे नेमकं काय म्हणणेआहे?
कोल्हापुरातल्या लक्ष्मीपुरी धान्य बाजारपेठेत गेल्या 25 वर्षांपासून या व्यवसायात असलेले संदीप मकोटे यांच्याकडे धान्य, डाळींच्या किमती वाढण्यामागे नेमके काय कारण आहे? याबाबत जाणून घेतली असता ते म्हणाले की, लॉकडाऊनमुळे सद्या बाजारात मागणीच्या तुलनेत आवक कमी होत आहे. शिवाय गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब यांसह राज्यातील काही महत्वाच्या जिल्ह्यांमधील शहरात लॉकडाऊनमुळे बाजार बंद होते. त्यामुळे, तिथेही आवक बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात सर्वत्र तुटवडा भासू लागला. अजूनही बाजारात दरवर्षीच्या तुलनेत आवक कमी आहे. परिणामी, लॉकडाऊनच्या आधी आणि आताच्या दरातील तफावत पाहिली तर डाळी, कडधान्य आदींच्या किंमतीमध्ये 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अजूनही अनेक शहरांत विविध निर्बंध घातले आहेत. त्यामुळे, अजूनही किंमती वाढलेल्या आहेत.
डाळी, धान्यांचे आधीचे आणि सद्याचे दर पुढीलप्रमाणे
तूरडाळ : आधीचे दर 9 हजार रुपये क्विंटल, सद्या 9 हजार 800 रुपये
हरभरा : आधीचे दर 5 हजार 500 रुपये क्विंटल, सद्या 6 हजार 500 रुपये
मुगडाळ : आधीचे दर 9 हजार रुपये क्विंटल, सद्या 10 हजार 500 रुपये
मसूरडाळ : आधीचे दर 7 हजार रुपये क्विंटल, सद्या 8 हजार रुपये
ज्वारी : आधीचे दर 3 हजार रुपये क्विंटल, सद्या 4 हजार रुपये
हिरवा मूग : आधीचे दर 8 हजार रुपये क्विंटल, सद्या 9 हजार रुपये
मटकी : आधीचे दर 10 हजार रुपये क्विंटल, सद्या 12 हजार रुपये
हिरवा वाटाणा : आधीचे दर 8 हजार रुपये क्विंटल, सद्या 13 हजार रुपये
मसुरा : आधीचे दर 6 हजार रुपये क्विंटल, सद्या 7 हजार रुपये
बासमती तांदूळ : आधीचे दर 4 हजार रुपये क्विंटल, सद्या 4 हजार 800 रुपये
खाद्यतेल : पूर्वी 80 ते 90 रुपये किलो, सद्या 170 ते 190 रुपये किलो
डाळी, धान्यांचे दर कमी करून दिलासा द्यावा :
कोल्हापुरातील सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा किराणा मालाच्या किंमतीत झालेल्या वाढीनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. सरकारने यामध्ये लक्ष घालून सर्वांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अनेकांकडून सरकार विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या 15 महिन्यांपासून सामान्य नागरिकांच्या जीवनात लागणाऱ्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, ज्यामध्ये डाळी, खाद्यतेल, धान्य यांचा समावेश आहे, त्यांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केंद्र आणि राज्यसरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे, तसेच लोकांच्या जीवनात जो लादलेला लॉकडाऊन आहे, त्यामुळे या महागाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. राज्य आणि केंद्र सरकारने मिळून यामध्ये मार्ग काढून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.
गेल्या वर्षी 80 ते 90 रुपये किलो मिळणारे खाद्यतेल आता 170 ते 190 रुपयांपर्यंत जाऊन पोहचले आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे व्यवसाय बंद पडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच दररोजच्या जीवनात लागणारे डाळी, धान्यांचे दर जर इतक्या झपाट्याने वाढत राहिले तर त्यांनी कसे जगायचे? आणखी किती दिवस अशी महागाई सुरू राहणार? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा -केवळ बिंदू चौकात नव्हे, राज्यात कुठेही चर्चेसाठी तयार; हसन मुश्रीफांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार