कोल्हापूर : प्रजासत्ताक दिन संचलन शिबिरात (Republic Day Parade) तब्बल सात वर्षांनंतर महाराष्ट्राच्या कॅडेट्सनी मानाचा तसेच सर्वोत्कृष्टतेचा पंतप्रधान बॅनर पटकावला. शुक्रवारी झालेल्या एका दिमाखदार कार्यक्रमात हा बहुमान प्रदान करण्यात आला. या संचालनासाठी कोल्हापूरच्या सुद्धा तीन युवतींची निवड झाली होती. यातील श्रुती बाम या कोल्हापूरच्या वाघिणीने दिल्ली येथे पंतप्रधान बॅनर पटकावल्यानंतर दिलेली शिवगर्जना व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकांकडून तिचे आणि तिच्यासोबत सहभागी कॅडेट्सचे कौतुक होत आहे.
श्रुतीची शिवगर्जनेचा व्हायरल व्हीडीयो कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' तिघींची संचालनासाठी निवड प्रजासत्ताक दिन संचलनासाठी कोल्हापूर विभागातून एकूण 9 जणांची तर कोल्हापूर जिल्ह्यातील चौघांची निवड झाली होती. यामध्ये वैनायकी कुलकर्णी, श्रेया देसाई, श्रुती बाम आणि संकेत चौगले या चौघांची कोल्हापूरातून तर समृद्धी कदम (सातारा), दिशा पाटकर (चिपळूण), प्रथमेश शिंदे (सांगली), सुमित साळुंखे (सातारा), ओंकार मोराजकर (सिंधुदुर्ग) यांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील एकूण 57 कॅडेट्सची संचलन शिबिरासाठी निवड झाली होती. त्यातील 18 जणांना राजपथावर संचलन करण्याचा मान मिळाला. दरवर्षी होणाऱ्या संचलनात मानाचा पंतप्रधान बॅनर बहुमान कोण पटकावणार याची उत्सुकता असते. मात्र तब्बल 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राने विजेतेपद पटकावले.
शिवगर्जनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल
दरम्यान, कोल्हापूरची कन्या श्रुती बामने विजेतेपद पटकवल्यानंतर सर्वांसोबत शिवगर्जना दिली. त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच हा व्हिडिओ पोस्ट करत तिचे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या कॅडेट्सचे कौतुक केले आहे.