कोल्हापूर -राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्येक दुकानावर मराठी पाटी मोठ्या अक्षरात असली पाहिजे ( Marathi Boards on Shop ) याबाबत निर्णय झाला होता. तसेच सर्व दुकानदारांना हे बदल करण्यासाठी काही कालावधीही देण्यात आला होता. मात्र, बरेच दिवस गेल्याने कोल्हापुरात मराठी पाट्यांसाठी शिवसेना आक्रमक झाली ( Shivsena Aggressive ) आहे. कोल्हापूर शहरातील अनेक दुकानांवर अजूनही इंग्रजी फलक आहेत. या पाट्या मराठीत करण्यात यावे यासाठी शिवसेनेने शनिवारी (दि. 26 फेब्रुवारी) आंदोलन केले आहे. कोल्हापुरातील धैर्याप्रसाद हॉल परिसरातील ज्या दुकानांवर इंग्रजी शब्दातील पाट्या आहेत, अशा दुकानांवर मराठी अक्षरांची पाटी लावून शिवसेना स्टाईलने आंदोलन केले आहे. तसेच एक महिन्यात शहरातील सर्व दुकानदारांनी मराठी अक्षरांमध्ये दुकानाचे नाम फलक करण्याचा अल्टिमेटम शिवसेनेने दिला आहे. संबंधित विभागाने व्यापाऱ्याशी चर्चा करुन मराठी पाट्या लावण्यासाठी सांगाव्यात अन्यथा शिवसैनिक कायदा हातात घेऊन दुकांनावर पाट्या लावतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयास मनसेने पाठिंबा दर्शवत घोषणा न करता अंमलबजावणीही करावी, असेही मनसेकडून सांगण्यात आले होते. मात्र, काही व्यापाऱ्यांनी आणि संघटनानी या निर्णयास विरोध दर्शवला होता. आता शिवसेना रस्त्यावर उतरून प्रत्यक्षपणे मराठी पाट्या लावण्यास सांगत आहे.
कन्नड लोकांना त्याच्या भाषेचा अभिमान तर महाराष्ट्राच्या लोकांना मराठीचा का नाही..? -मराठी राजभाषा दिनानिमित्त आणि मराठी भाषेला प्राधान्य देण्यासाठी कोल्हापुरात शिवसैनिकांनी आज आंदोलन केले आहे. शहरातील इंग्रजी अक्षरात असलेल्या पाट्यानवर मराठी पाट्या लावत राज्य शासनाच्या मराठी पट्या संदर्भातील मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयाची दुकानदारांनी अंमलबजावणी करावी. यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संजय पवार म्हणाले, राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, शहरात अजूनही अनेक अस्थपनाच्या पाट्या इंग्रजी भाषेत असल्याचे दिसत आहे. जिल्हाधिकारी, संबधित विभाग आणि चेंबर्स ऑफ कॉमर्स एकत्र येऊन सर्व दुकानदारांना मराठी पाट्या करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. कर्नाटकात जाऊन पाहा सर्वत्र कन्नड भाषेतील फलक दिसतात. तेथे मराठी किंवा अन्य कोणती भाषा जास्त बोलले जात नाही. कन्नड भाषेचा एवढा अभिमान कानडी लोकांना आहेत तर महाराष्ट्राच्या लोकांना मराठीचा का नाही, असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.
काय होता मंत्रिमंडळाचा निर्णय -गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील आस्थापनांना देवनागरी लिपीत म्हणजेच मराठी भाषेमध्ये पाट्या लावाव्यात. दुकानदारांना मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतील पाटी लिहिण्यास संमती असेल. मात्र, मराठी भाषेला प्राधान्य दिले जावे, इतर भाषेतील अक्षरांच्या आकारापेक्षा मराठी अक्षरे लहान असू नयेत. मद्य विक्री किंवा मद्यपान विक्रेत्यांनी महापुरुष, महिला किंवा गड-किल्ल्यांची नावे देऊ नयेत, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात काही संघटना उच्च न्यायालयात गेल्या होत्या. मात्र त्यांची याचिका ही फेटाळून लावली गेली होती.
हेही वाचा -भाजपच्या दडपशाहीविरोधात सोशल मीडियावर व्यक्त व्हा; पालकमंत्री सतेज पाटलांचे आवाहन