कोल्हापूर - राजकारणापेक्षा माणुसकी महत्वाची आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये (North Kolhapur Bypoll) जयश्री जाधव (Jayashri Jadhav) यांना बिनविरोध करण्यास आपला विरोध नाही. पोटनिवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून पक्षप्रमुखांचा जो आदेश येईल त्यानुसार आमची पुढची भूमिका असेल, असे वक्तव्य राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी केले आहे.
कोल्हापूर उत्तरचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (MLA Chandrakant Jadhav Death) यांच्या निधनानंतर आता या जागेसाठी पोटनिवडणूक लागणार आहे. मात्र, या जागेसाठी आता राजकारण सुरू होताना जाणवत आहे. जाधवांच्या शोकसभेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी तिकीट जयश्री जाधव यांना देऊन त्यांना बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन केले होते. दुसऱ्या बाजूला माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना याबाबत विचारले असता क्षीरसागर म्हणाले, माणुसकीपेक्षा राजकारण मोठं नाही. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाची घटना दुदॆवी आहे. माझ्यावतीने व शिवसेनेच्यावतीने त्यांना आदरांजली वाहिली आहे. आमदार म्हणून त्यांना पाच वर्षे पूर्णवेळ मिळायला पाहिजे होता. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक बिनविरोध करण्यासंबंधी आवाहन केले आहे. जाधव यांच्या निधनानंतर होणारी पोटनिवडणूक लढवायची की बिनविरोध करायची यासंबंधीचा निर्णय पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. पक्षप्रमुख ठाकरे हे मोठ्या मनाचे आहेत. ते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल. जर निवडणूक लागली तर आपली लढायची तयारी आहे. सध्या सर्वच निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जात असतील तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा देखील योग्य सन्मान राखला पाहिजे. महविकास आघाडी म्हणून शिवसेनेवर कायम अन्याय होत आहे, अशी कार्यकर्त्यांची मानसिकता असल्याचे माजी आमदार क्षीरसागर यांनी यावेळी म्हटले आहे. गोकुळची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जात असेल तर महापालिकेची निवडणूक का नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित करत महापालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचं आवाहनही त्यांनी केले आहे.
- २०१९ ला थोड्या मतांनी झाला होता पराभव -