कोल्हापूर -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागीय मंडळामार्फत जिल्ह्यात उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) परीक्षा येत्या 16 सप्टेंबर 2021 ते 11 ऑक्टोबर 2021 पर्यंत तसेच माध्यमिक शालांत (इयत्ता 10 वी) ची परीक्षा 22 सप्टेंबर 2021 ते 08 ऑक्टोबर 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. या परीक्षा शांततेत, सुव्यवस्थेत व सुरळीत पार पाडण्यासाठी आणि परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच या परीक्षेचे कामकाज सुयोग्य पद्धतीने तसेच कॉपीमुक्त होण्यासाठी परीक्षा केंद्राच्या आवारात, परिसरात इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यास वेळीच बंदी घालण्यासाठी प्रशासनाकडून कलम 144 लागू करण्यात आले आहे. अपर जिल्हादंडाधिकारी भाऊ गलांडे यांनी हे पारित केले आहेत.
हेही वाचा -ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, छगन भुजबळांची माहिती
- 'या' दिवशी असेल बंदी आणि 'हे' आहेत निर्बंध :
क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 मधील कलम 144 अन्वये जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परीक्षा केंद्रांच्या, उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2021 या कालावधीत, ज्या दिवशी परीक्षा पेपर नसतील ते दिवस वगळून सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सी.आर.पी. सी. 1974 चे कलम 144 नुसार मोबाईल फोन बाळगण्यास, वापरण्यास, झेरॉक्स मशीन, फॅक्स मशीन, पेजर व लॅपटॉप यांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी भाऊ गलांडे यांनी आज पारित केले आहेत.
- आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई :
दरम्यान, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरोधात फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारासुद्धा देण्यात आला आहे. शिवाय हा बंदी आदेश परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांना नेमून दिलेल्या परीक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणासाठी लागू राहणार नाही, असेही या आदेशात म्हंटले आहे.
हेही वाचा -राज कुंद्रा प्रकरण : गुन्हे शाखेने दीड हजार पानांचे पुरवणी दोषारोपपत्र केले न्यायालयात सादर