कोल्हापूर :हरियाणा सरकारने 70 वर्षे पूर्ण झालेल्या झाडांना पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. याचे कौतुक करत महाराष्ट्रात सुद्धा वृक्षांच्या संवर्धनासाठी अशाच पद्धतीने काही योजना राबविल्या पाहिजे, असे मत सुप्रसिद्ध अभिनेते आणि वृक्षसंवर्धनाची मोठी चळवळ उभी केलेले सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले आहे. शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये सुद्धा याबाबत नुकतीच एक बैठक सुद्धा पार पडली असल्याची त्यांनी माहिती दिली.
टॉप १०० सेलिब्रिटी झाडं..
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत अभिनेते सयाजी शिंदे यांची बैठक झाली. याची माहिती देताना शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात सुद्धा वृक्षसांवर्धनासाठी तसेच मुलांना शाळेत असल्यापासूनच झाडांचं महत्व समजावे यासाठी अनेक उपाययोजना करू शकतो. खरंतर आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत झाडांचं आपल्या जीवनात खूप महत्व आहे. मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देण्यापासून झाडांचे अनेक फायदे आहेत. म्हणूनच जुन्या झाडांना खऱ्या अर्थाने सेलिब्रिटीचा दर्जा दिला गेला पाहिजे असे शिंदे यांनी म्हटले.