कोल्हापूर : मराठा समाजातील समन्वयकांच्या आंदोलनाबाबत मला आत्ता समजले. समन्वयकांच्या देखील भावना आहेत. मला जे शब्द दिले होते त्यानुसार तारखेप्रमाणे काही गोष्टी झाल्या नाहीत. मात्र, काहीच केले नाही असे सुद्धा नाही असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. शिवाय भावना व्यक्त करणे हा तुमचा अधिकार आहे. मात्र, हातात कायदा घेऊन कोणती गोष्टी करू नका असे आवाहनसुद्धा संभाजी राजे यांनी (Sambhajiraje in kolhapur) आंदोलकांना केले. कोल्हापूरात शाहू स्मृती शताब्दी पार्श्वभूमीवर कृतज्ञता पर्वाचे (Krydanyata Parva) आयोजन केले आहे. या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आज शाहू मिल येथे आयोजित प्रदर्शन पाहण्यासाठी ते आले होते तेंव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः दूरध्वनीवरून संवाद साधला आहे. काही गोष्टी कागदोपत्री आहेत त्यावर मार्ग निघाला पाहिजे. उद्या कॅबिनेट बैठक झाल्यानंतर समन्वयकांशी बोलण्याचा शब्द अजित पवार यांनी दिला आहे. सरकारने आदेश दिले की, त्यांचे पालन करणे अधिकाऱ्यांचे काम आहे. काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या अधिकाऱ्यांनी दूर केल्या पाहिजेत. अधिकाऱ्यांची देखील तेवढीच जबाबदारी आहे. त्यामुळे लवकर तुम्ही दिलेल्या तारखा पाळून त्यावर मार्ग काढा अशी अपेक्षा असल्याचे सुद्धा यावेळी संभाजीराजे यांनी म्हंटले. गरीब मराठ्यांसाठी जे मला करायचं होते ते मी केले असेही ते यावेळी म्हणाले.