कोल्हापूर - युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा पोलंडकडून बेणे मेरितो पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पोलंडच्या नागरिकांना सहकार्य केलेल्या इतर देशातील नागरिकांना पोलंड परराष्ट्र मंत्रालयामार्फत हा पुरस्कार प्रदान केला जातो. त्यानुसार संभाजीराजे यांना नुकताच हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मंगळवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पोलंड दूतावासात झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला सन्मान -भारत व पोलंड या दोन्ही राष्ट्रांमधील ऐतिहासिक बंध पुन्हा जोपासण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पोलंडचे परराष्ट्र मंत्री झ्बिग्नीव राऊ यांच्या हस्ते ‘द बेने मेरिटो’ हा सन्मान युवराज संभाजीराजे छत्रपती यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील पोलंड दूतावासात झालेल्या कार्यक्रमात हा सोहळा पार पडला.
दोन वर्षांपूर्वी कोल्हापुरात पार पडला होता 'हा' खास समारंभ -दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलंडच्या 5 हजार निर्वासित नागरिकांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने आसरा दिला होता. या नागरिकांसाठी वळीवडे येथे मोठा कॅम्प उभारण्यात आला होता. 2019 साली या घटनेस 70 वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्ताने संभाजीराजे छत्रपती यांनी या कॅम्पमध्ये राहिलेल्यांपैकी हयात असणाऱ्या नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना राज्य अतिथी म्हणून याठिकाणी निमंत्रित केले होते. वळीवडे पोलंड कॅम्पच्या स्मृती जगविण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 14 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या या कार्यक्रमात पोलंडचे उप परराष्ट्र मंत्री मार्सिन प्रझिडाक आणि भारतातील पोलंडचे राजदूत अॅडम बुराकोव्स्की हे देखील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते 1942 ते 1949 या काळात येथे वास्तव्य करणाऱ्या या पोलिश कुटुंबांच्या आणि नागरिकांच्या स्मरणार्थ एक स्मृतीस्तंभाचे अनावरण आणि संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली होती.
यावेळी संभाजीराजेंनी ज्यावेळी जग युद्धाने उद्ध्वस्त झाले, युरोप उद्ध्वस्त झाला आणि भारताचा काही भाग भयंकर दुष्काळाच्या खाईत होता, तेव्हा कोल्हापूरच्या छत्रपतींनी या पोलिश कुटुंबांना मानवतावादी आधारावर दत्तक घेतले. आम्हाला ही भावना स्मारक आणि संग्रहालयाच्या माध्यमातून जिवंत ठेवायची आहे. ज्यामुळे इंडो-पोलिश संबंध अधिक दृढ होतील असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे पोलंड आणि कोल्हापूरमधील नाते अजूनही किती घट्ट आहे, याची प्रचिती येते.