कोल्हापूर-युती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, हे कपाळकरंटे पांढऱ्या पायाचे सरकार आल्यानंतर मराठा समाजाचे आरक्षण रद्द झाले. अशी जळजळीत टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केली. अशोक चव्हाण तुम्ही फार हुशार आहात. तुमचा आदर्श सर्वांनी घ्यावा. वेड्याच्या दवाखान्यात जाण्याची अवस्था तुमची झाली आहे. दोन वर्ष अफूच्या गोळ्या खाऊन काम करत होता का? असा सवाल राज्य सरकारला सदाभाऊ खोत यांनी केला. ते कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अफूच्या गोळ्या खाऊन राज्य चालवता का? - सदाभाऊ खोत पुढे सदाभाऊ खोत म्हणाले, महा विकास आघाडी सरकार हे मराठा समाजाचे शत्रू आहे. सारथी सारखी संस्था या सरकारने बंद पाडली. नाव मराठ्यांचे घेऊन तुम्ही सरदारक्या कशाला भोगता? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला. ज्यावेळी तुम्ही केंद्रात सत्तेत होता आणि राज्यातही सत्तेत होता. त्यावेळी तुमचे हात पाय कोणी बांधले होते? असा सवाल देखील सदाभाऊ खोत यांनी केला.
अशोकराव चव्हाण आता तुम्ही पोपटासारखे बोलत आहात. मात्र, पिंजऱ्यातील पोपटाची जशी अवस्था आहे, तशीच तुमची अवस्था झाली आहे. प्रस्थापित मराठा समाजाला आरक्षण नको आहे. ज्यांना आरक्षण नको आहे, अशा मराठा नेत्यांनी खुराड्यात बसून अंडी घालावीत. विस्थापित मराठ्यांना आरक्षण देण्याची प्रस्थापित मराठ्यांची भूमिका नसल्याचे दिसून येत आहे, असे विधान सदाभाऊ खोत यांनी केले.
महाविकास आघाडी सरकारला देवाच्या आळंदीला जायचे होते.मात्र, हे सर्व आता चोराच्या आळंदीला निघाले आहेत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रस्थापित मराठा समाजाच्या नेत्याला समितीचा अध्यक्ष करू नये. अशोक चव्हाण यांना या अध्यक्ष पदावरून हटवावे. या धनदांडग्या नेत्यांना या समितीवर अध्यक्ष करायला नको. मुख्यमंत्र्याचा कोतवाल झालेला व्यक्ती सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे, असा खोचक टोला देखील सदाभाऊ खोतांनी अशोक चव्हाण यांना लगावला.
मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने कोर्टात योग्यरीत्या बाजू मांडली नाही. विरोधीपक्षांना सोबत घेतले नाही. वकिलांना मार्गदर्शन केले नसल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. गायकवाड समिती मधील महत्त्वाचे पुरावे सुनावणीवेळी महा विकास आघाडी सरकारने जोडले नाहीत. असा आरोप देखील सदाभाऊ खोत यांनी केला.
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकार कोर्टात गेले. मात्र, राज्य सरकार पुन्हा कोर्टात का गेले नाही, असा सवाल करत सरकारमध्येच मराठा समाजाच्या नेत्यांना आरक्षण नको असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. अशोक चव्हाण तुम्ही खूप हुशार आहात, तुमचा आदर्श पहिल्यापासूनच घेण्यासारखा आहे. त्यामुळे दोन वर्ष अफूच्या गोळ्या खाऊन काम करत होता का? असा सवाल राज्य सरकारला सदाभाऊ खोत यांनी केला आहे.