कोल्हापूर -तीन टप्प्यात एफआरपीची मागणी साखर संघाची आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ठेवला आहे. निती आयोगाने त्यात फक्त पर्याय सुचवला आहे. या एफआरपीचे तीन तुकडे केंद्र सरकार करणार अशा फक्त अफवा आहेत. काही लोक सहानुभूती मिळवण्यासाठी आव आणत आहेत. हा जाब त्यांनी आघाडी सरकारला विचारावा. तसेच हिंमत असेल तर सरकारमधून बाहेर पडावं, असे आव्हान रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव न घेता दिले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
- राज्य सरकारच एफआरपीचे तुकडे करेल -
सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, एफआरपी संदर्भात लवकरच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी देशाच्या सहकार मंत्र्यांना भेटणार आहोत. एफआरपीचे तुकडे केंद्र सरकार करणार नाही. जर एफआरपीचे तुकडे केले तर राज्य सरकारच करेल. एफआरपीचे तुकडे करण्यासाठी केंद्र सरकार यात हस्तक्षेप करणार नाही. हे आम्ही भाजपचे मित्र पक्ष आहोत म्हणून ठामपणे सांगतो, असा स्पष्ट खुलासा सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
- मुश्रीफ यांनी काही केलेच नाही तर डर कशाला -
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, जर मुश्रीफ यांनी काही केलेच नाही तर डर कशाला. माझ्यावर देखील माझ्या सहकाऱ्यांनी आरोप केले होते. मात्र मी त्या आरोपांना आव्हान दिलं होतं. आरोप झालेल्या नेत्यांनी घाबरू नये. त्याला आव्हान द्यावं असं सदाभाऊ खोत म्हणाले.
महिन्याला ग्रामपंचायतमधून दीड लाख रुपये कर स्वरूपात जातात. मात्र, संगणक परिचारक यांना सहा हजार रुपये मानधन दिले जाते. मग हाही एक मोठा घोटाळा आहे असं आम्ही म्हणू का? असा आरोप वजा टोला सदाभाऊ खोत यांनी मंत्री मुश्रीफ यांना लगावला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. ते मोठे आहेत. त्यामुळे अब्रुनुकसानीच्या दाव्याची रक्कम नेहमी मोठी असते. दुसऱ्याची मिरवणूक काढण्यापेक्षा या नेत्यांनी निर्दोष झाल्यावर स्वतःची हत्तीवरून मिरवणूक काढून घेतो असे जाहीर करावे, असा टोला देखील मुश्रीफ यांना सदाभाऊ खोत यांनी लगावला.