कोल्हापूर - महाराष्ट्र झोपेत असतानाच राज्य सरकार रात्रीत कोसळेल, असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावाले कोमात आहेत की काय? अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. गेली अठरा महिने आमचे सरकार सुस्थितीत चालले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्वाळा देत दीड वर्षांपूर्वी झालेली विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचाही आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
'आमचे सरकार पाच वर्षे चांगले चालणार'
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरून सरकारबद्दल नाराजी व आंदोलन केल्याकडे लक्ष वेधले असता मुश्रीफ म्हणाले, ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला त्यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे. १०२ व्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षणाबाबत राज्यांना अधिकार नाहीत. तसेच पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही व गायकवाड समितीचा अहवालही विश्वासार्ह नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, दीड वर्षांपूर्वी झालेली विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केला. चंद्रकांत पाटील हे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बोनसमध्ये चालले असल्याची टीका करीत आहेत. याबद्दल विचारले असता मुश्रीफ म्हणाले, गेले अठरा महिने राज्यसरकार चांगले चाललेले आहे. सरकार तर पाच वर्षे चालणार आहेच आणि त्याचा बोनस त्यानंतर त्यापुढच्या पाच वर्षात मिळणार आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात गेलेली "सेव्ह मेरीट-सेव्ह नेशन" ही संघटना भाजपा आणि आरएसएसशी संबंधित असल्याचा आरोप करतानाच मुश्रीफ म्हणाले, या संघटनेचे पदाधिकारी भाजपा आणि आरएसएसचेही पदाधिकारी आहेत.