कोल्हापूर - जिल्ह्यातील दूध संघाची म्हणजेच गोकुळची निवडणूक तोंडावर आली आहे. ठराव दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत, त्यामुळे नेत्यांची लगबग सुरू आहे. मात्र, गोकुळची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी स्वतः सतेज पाटील यांच्याकडे प्रस्ताव घेऊन जाणार असल्याचे पी एन पाटील यांनी आज म्हटले.
गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार की सतेज पाटील सत्ताधाऱ्यांसमोर मोठं आव्हान उभे करणार ? - गोकुळ दूध संघ निवडणूक
गोकुळ दूध संघाची निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीत सतेज पाटील यांचे सत्ताधारी गटा समोर मोंठे आव्हान उभे आहे. ही निवडणूक बिनविरोध होते का हे पाहणे रंजक ठरणार आहे.
सतेज पाटील यांनी पी. एन. पाटील यांना सोबत येण्याचे आवाहन केले होते, पण पी. एन पाटील हे महादेवराव महाडिक यांच्यासोबत राहिले. त्यामुळे कोल्हापूर काँग्रेसमधील बंटी आणि पी एन वाद कायम असल्याचे दिसून आले. दुसऱ्या बाजूला सत्ताधारी गटातसुद्धा फूट पडली आहे. विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांनी स्वतःचे ठराव दाखल करून आपल्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत रंग भरणार हे निश्चित झाले आहे.
सत्ताधाऱ्यांनी आज एकत्र मिळून 2200 हुन अधिक ठराव दाखल केले आहेत, पण सतेज पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच सत्ताधारी एकत्र जाऊन ठराव जमा करून आपल्याकडे जास्त ठराव आल्याचे दाखवतील पण निवणुकीत मात्र आपलाच विजय होईल असे म्हटले होते. सतेज पाटील यांना असलेल्या या विश्वासामुळे गोकुळची लढाई अधिक रंजक बनणार यात शंका नाही, पण विरोधकांनी मात्र निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. पी. एन. पाटील हे स्वतः प्रस्ताव घेऊन सतेज पाटील यांच्याकडे जाणार आहेत. मात्र, सतेज पाटील त्यांचा हा प्रस्ताव मान्य करणार का हेच पाहावे लागणार आहे.