कोल्हापूर - कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. एकूणच विधान परिषदेमध्ये भाजपला मिळालेलं अपयश आणि आगामी महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासोबत चर्चा केल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले.
निवडणुकीत आरपीआय भाजपासोबत राहणार-
विधान परिषदेमध्ये भाजपला मोठ अपयश मिळाले. गेले अनेक वर्ष भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या पुणे पदवीधर मतदार संघाची जागा देखील भाजपला गमवावी लागली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आपण चर्चा केल्याची माहिती रामदास आठवले यांनी पत्रकारांना दिली. महाराष्ट्रातील आगामी महापालिकेच्या निवडणुकासंदर्भातही चर्चा झाली. या निवडणुकीत आरपीआय भाजपासोबत राहणार असल्याचा विश्वासही आपण चंद्रकांत पाटील यांना दिल्याचे आठवले यांनी यावेळी सांगितले.