कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे १४ मार्च रोजी घेण्यात येणारी परीक्षा अचानक पुढे ढकलली. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचे काल संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. शिवाय राज्यभर मध्ये विज बिल कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू झाली आहे, याच्या निषेधार्थ आज भाजपच्यावतीने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करण्यात आला. जवळपास एक तासाहून अधिक वेळ जिल्हाधिकारी कार्यालया समोरील रस्ता भाजपच्या कार्यकर्त्यांनी रोखला होता.
कोल्हापूरात भाजपकडून रास्तारोको; दरम्यान, 21 मार्च रोजी परीक्षा होईल असे जाहीर करण्यात आले आहे. मात्र पुन्हा एकदा तारीख पुढे गेल्यास राज्यभरात तीव्र पडसाद उमटतील असा इशारा सुद्धा भाजप कडून देण्यात आला. याबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.
भाजप विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम :
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने गेल्या 13 महिन्यात अनेक चुकीचे निर्णय घेत घोटाळे केले आहेत. एमपीएससी परीक्षांबाबत सुरू असलेल्या अनिश्चित व्यवस्थेविरोधात भारतीय जनता पार्टी विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम उभी आहे. नियोजित परीक्षा का पुढे ढकलल्या ? याचे उत्तर अपेक्षित आहे. एमपीएससी आयोगाने ही परीक्षा घ्यायची तयारी दाखवली असताना हा परीक्षा स्थगितीचा निर्णय कोणाचा होता? वडेट्टीवार यांसारखे जबाबदार मंत्री परीक्षा पुढे ढकलण्याची मला माहीत नाही असे म्हणतात. याअर्थी महाविकास आघाडीचा प्रशासनावर वचक नाही, अशा पद्धतीने मोठा घोळ कोणाच्या चुकीमुळे किंवा निर्णयामुळे झाला याची चौकशी झाली पाहिजे असंही चिकोडे यांनी म्हटले. शिवाय 21 तारखेला परीक्षा झाली नाही तर भाजपच्या वतीने तीव्र लढा उभा करू असा इशाराही यावेळी चिकोडे यांनी दिला.
अधिवेशन संपताच वीज तोडणीचे आदेश निषेधार्ह :
यावेळी वीज बिलासंदर्भात सुद्धा बोलताना जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज कनेक्शन तोडणार नाही असं म्हटलं होतं. पण अधिवेशन संपताच वीस तोडणीसाठी महावितरण कंपनीला सूचना देण्यात आल्या ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनं महाराष्ट्रातील जनतेची घोर फसवणूक व त्यांच्यावर अन्याय केला आहे. जोपर्यंत हा दूर होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान, यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकार्यांना भाजपच्या वतीने त्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.