कोल्हापूर - लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिल तातडीने माफ करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येत्या 19 मार्चला पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. कोल्हापुरातील राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदीच्या पुलावर चक्काजाम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची आज बैठक पार पडली यानंतर ते बोलत होते.
हेही वाचा -जळगाव महापालिका सत्तासंघर्ष : भाजपच्या बंडखोर नगरसेवकांना रुचली नाही राष्ट्रवादीच्या खडसेंची 'एन्ट्री'!
सरकार झोपेचे सोंग घेत आहे :
यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, आम्ही गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफ करा अशी मागणी करत आहोत. मात्र राज्य सरकार झोपेचं सोंग घेत आहे. कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट सुरू आहे. मंत्र्यांचे बंगले सजवायला त्यांच्याकडे पैसे आहेत. मात्र सर्वसामान्यांना वीज बिलात सवलत द्यायला पैसे नाहीत. लॉकडाऊनची भीती घालून आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा राज्यभर तीव्र पडसाद उमटतील असा इशारासुद्धा शेट्टी यांनी यावेळी दिला.
सर्व पक्षीयांनी आंदोलनात सामील व्हावे :
यावेळी शेट्टी म्हणाले, राज्य सरकारला जागण्यासाठी 19 मार्च रोजी कोल्हापुरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पंचगंगा नदीच्या पुलावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातल्या सर्वपक्षीयांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे. राज्य सरकारला संघटित होऊन वीज बिलांच्या बाबत लक्ष द्यायला भाग पाडू असे आवाहन सुद्धा शेट्टी यांनी यावेळी केलं. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा -राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर; केंद्र सरकारचे राज्याला पत्र