कोल्हापूर- खेकड्यांना दोरीला बांधून कार्यकर्ते घोषणा देत पोलीस ठाण्यात आले. या खेकड्यांना थेट पोलीस निरीक्षकांच्या टेबलवर ठेवण्यात आले. कार्यकर्त्यांच्या घोषणा वाढल्या, कार्यकर्त्यांनी या खेकड्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने पोलीस निरीक्षकही चक्रावले. या खेकड्यांनी तिवरे धरण पोखरल्याचा कार्यकर्त्यांनी आरोप केल्याने आता करायचे काय असा सवाल पोलीस निरीक्षकांनाही पडला. हे अनोखे आंदोलन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज कोल्हापुरात केले.
खेकड्यांनी धरण पोखरल्याचा हास्यास्पद आणि खळबळजनक खुलासा मंत्री तानाजी सावंत यांनी केला. त्याचे पडसाद आज कोल्हापुरात उमटले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट खेकड्यांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात घेऊन आले. या खेकड्यांनी धरण पोखरुन तब्बल 23 जणांचा बळी घेतल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांकडे केला.