कोल्हापूर -अतिवृष्टीसाठी राज्य सरकारने 10 हजार कोटींची मदत जाहीर केली याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वागत केले आहे. मात्र, जाहीर केलेली ही मदत झालेल्या नुकसानीपेक्षा अपुरी आहे, एवढ्याने शेतकऱ्यांचे समाधान होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने आता केंद्राकडे अधिक मदतीसाठी पाठपुरावा करावा आणि राज्यातील विरोधी पक्षानेसुद्धा त्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
'एवढ्या मदतीने शेतकऱ्यांचे समाधान होणार नाही, विरोधी पक्षानेही केंद्राकडे पाठपुरावा करावा' - राजू शेट्टी राज्य सरकार
राज्य सरकारने जाहीर केलेली 10 हजार कोटींची मदत झालेल्या नुकसानीपेक्षा अपुरी आहे, एवढ्याने शेतकऱ्यांचे समाधान होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने आता केंद्राकडे अधिक मदतीसाठी पाठपुरावा करावा, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, राज्यातील अनेक भागात पाहणी केली. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली आहे. अनेकांची पिकं वाहून गेली आहेत, तर अनेकांच्या शेत जमिनीसुद्धा वाहून गेल्या आहेत. अनेकांच्या विहिरी ढासळलेल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आता केंद्राकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. केंद्र सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही. ज्या तातडीने केंद्र सरकारने बिहार राज्याला मदत केली त्याच तातडीने महाराष्ट्रालासुद्धा मदत जाहीर करावी. त्यासाठी विरोधी पक्षानेसुद्धा याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करून केंद्र आणि राज्य सरकारने मिळून आता शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, असेही राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले.