कोल्हापूर -एमपीएससीच्या परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होत आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा जरा विचार करा आणि परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. येत्या 14 मार्चला एमपीएससीच्या परीक्षा होणार होत्या. मात्र, दोन दिवसांवर असलेली परीक्षा अचानक रद्द झाल्याने राज्यभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. यावर शेट्टींनी सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त करत परीक्षा रद्दचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली आहे.
एमपीएससी परीक्षा रद्दचा निर्णय तात्काळ मागे घ्या, अन्यथा... ; राजू शेट्टींचा इशारा चार वेळा परीक्षा पुढे ढकलल्या; अजून किती वेळ खेळ करणार आहात ? -
आजपर्यंत एमपीएससीच्या परीक्षा चार वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. आता पुन्हा एकदा परीक्षा ढकलण्यात आल्या. असा किती वेळ खेळ करणार आहात असा सवाल राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाचा बाऊ करता तेंव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेचे अधिवेशनावेळी कोरोना नव्हता का असा सवालही शेट्टींनी केला.
विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत, त्यांचे बरोबरच -
विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जात परिक्षांनाही सामोरे जावे लागत असते. मात्र, अनेक वेळा परीक्षा पुढे ढकलल्यामुळे त्यांना प्रचंड त्रास होत आहे, विद्यार्थी संतप्त झाले आहेत. म्हणूनच आज राज्यभरात विविध ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यांनी हे बरोबरच केले असल्याचेही शेट्टींनी म्हंटले आहे. शासनाने हा निर्णय तात्काळ बदलावा अन्यथा आणखी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाहीत असेही त्यांनी म्हंटले आहे.