कोल्हापूर -अर्थसंकल्पात (MH Budget 2022) नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींची तरतूद हा एकच निर्णय शेतकऱयांच्या दृष्टीने चांगला असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti on Budget) यांनी दिली आहे. तसेच बाकी सर्व जुन्या प्रकल्पाचा उल्लेख केला असून, हे तर शिळ्या कडीला ऊत आले आहे, असेही ते म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडी सरकार गंभीर नाही -
नवीन अशी कोणतीही तरतूद यामध्ये केलीली नाही. २ लाखाहून अधिक कर्ज असणाऱया शेतकऱयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. उरलेली रक्कम भरून घेऊन २ लाखापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा यापुर्वी केली होती, मात्र, त्याची तरतूद यामध्येही केली नाही. नवीन कोणतीही घोषणा नाही. शेतकऱयांचे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. विजेचा प्रश्न गंभीर असून अद्याप त्यावर काहीही पर्याय निघाला नाही. शेतकऱयांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडी सरकार गंभीर दिसत नाही, असा आरोप राजू शेट्टी यांनी सरकारवर केला आहे. या अर्थसंकल्पात बाकी विशेष असे काही नाही, असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश -
राज्याचे अर्थ मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला. या संकल्पात राज्य सरकारने नियमित कर्ज भरणाऱया शेतकऱयांना ५० हजार रूपयांचे प्रोत्साहन पर अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचे यश असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने ५० हजार रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली होती. जर अर्थसंकल्पात या अनुदानाची तरतूद न केल्यास बारामतीला अजित पवारांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. याच आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारला १० हजार कोटींची तरतूद केली आहे, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.