महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शेतकऱ्यांना आतंकवादी होण्यास भाग पाडू नका; राजू शेट्टी भडकले - शेतकरी आतंकवादी बातमी

शेतकऱ्यांना आतंकवादी होण्यास भाग पाडू नये. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. तसेच त्यांना केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Raju Shetti
राजू शेट्टी

By

Published : Aug 27, 2021, 7:40 PM IST

Updated : Aug 27, 2021, 8:46 PM IST

कोल्हापूर -शेतकऱ्यांना पिकासाठी योग्य हमीभाव मिळत नाही. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसान मोबदला मिळत नाही. शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रयाग चिखली ते नरसिंह वाडी या मार्गावर शेतकरी संघर्ष यात्रा 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी राज्य सरकारने मागण्या मान्य कराव्यात. तसेच शेतकऱ्यांना आतंकवादी होण्यास भाग पाडू नये. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी
  • 1 सप्टेंबरपासून शेतकरी संघर्ष यात्रेची सुरुवात -

राजू शेट्टी पुढे म्हणाले, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने ठोस असा निर्णय घ्यावा. या मागणीसाठी 1 सप्टेंबरपासून शेतकरी संघर्ष यात्रेची सुरुवात करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली या ठिकाणापासून होणार आहे. या यात्रेचे नियोजन पाच दिवस असणार आहे. निगवे, भुये, शिये, शिरोली हलोंडी, चिंचवाड, पट्टणकोडोली, इंगळे, इचलकरंजी अब्दुल लाट, हेरवाड, तेरवाड मार्गे ही यात्रा नरसिंह वाडी येथे कृष्णा नदीच्या काठावर पोहोचणार आहे. या यात्रेत हजारो शेतकरी सहभागी होणार असून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कृष्णा नदीत जलसमाधी घेणार असल्याचं यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितलं.

  • कृषी योजनांच्या पोकळ घोषणा करू नका -

या यात्रेदरम्यान पोलिसांनी अद्याप कोणत्या सूचना दिलेल्या नाहीत. मात्र पोलीस आले तरी आम्ही ही यात्रा काढणारच. कारण शेतकऱ्यांचा जीवनमरणाचा प्रश्न आहे. केंद्र किंवा राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाहण्यासाठी कोणतच गांभीर्य नाही. पूरग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप सानुग्रह अनुदान दिलेले नाही. हे अनुदान गेले कुठे? असा सवाल देखील राजू शेट्टी यांनी केला आहे. विविध कृषी योजनांच्या पोकळ घोषणा करण्यापेक्षा आवश्यक त्या योजना राबवाव्यात. कृषिमंत्र्यांनी सांगावे कागदावर असणाऱ्या किती योजना आत्तापर्यंत शेतकऱ्यांसाठी राबवल्या आहेत? असं राजू शेट्टी म्हणाले.

हेही वाचा -जुन्या गोष्टी मलाही माहिती आहेत, त्या टप्प्याटप्प्याने बाहेर काढणार - नारायण राणे

  • कृषी मूल्य आणि नीतीमूल्य आयोग हे केंद्र सरकारचे गुलाम -

केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपी दरात 50 रुपयांची वाढ केली. मात्र ही वाढ करत असताना वाढणारी महागाई इंधन वाढ याचा विचार केलेला नाही. दळणवळणाचा खर्च वाढला आहे. यातून शेतकऱ्यांच्या हातात काय पडणार? असा सवाल करत राजू शेट्टी यांनी कृषिमूल्य आणि नीतीमूल्ये आयोगावर निशाणा साधला आहे. कृषी मूल्य आणि नीतीमूल्य आयोग हे केंद्र सरकारचे गुलाम आहे. केंद्र सरकारने त्यांना गुलाम म्हणून वागवू नये, असे शेट्टी म्हणाले.

सध्या राज्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल बातम्या सुरू आहेत. मात्र, केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपले अपयश लपवण्यासाठी चटपटीत बातम्या तयार करत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठीच अशा बातम्या तयार करण्यात केंद्र आणि राज्य सरकारला रस आहे. हाच डाव हे दोन्ही सरकार खेळत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

  • शेतकऱ्यांना तालिबानी वृत्तीला सामोरे जायला लावू नका -

सोलापुरातील शेतकऱ्याने शेतामध्ये गांजा लावण्यासाठी परवानगी मागितली. यात त्याचे काय चुकले. सध्या पिकाला योग्य हमीभाव मिळत नाही. महागाईमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जर अमली पदार्थांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नसेल तर त्या शेतकऱ्याचे काय चुकले? असा सवाल राजू शेट्टी यांनी करत शेतकऱ्यांना आतंकवादी करू नका. शेतकऱ्यांना तालिबानी वृत्तीला सामोरे जायला लावू नका. केंद्र सरकारने असे निर्णय घेतल्यास शेतकरी संतापेल, असे शेट्टी म्हणाले.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी अद्याप घोषित केलेली नाही. मात्र, त्या प्रश्नांची आता मला काही देणे घेणे नाही. अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा -मुख्यमंत्री आणि फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा; तर्कवितर्कांना उधाण

Last Updated : Aug 27, 2021, 8:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details